निम्मा पावसाळा ओसरला तरीही जलाशयांत ठणठणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:34 AM2021-08-17T04:34:00+5:302021-08-17T04:34:00+5:30
विजय मानकर सालेकसा : यंदाचा पावसाळा अर्ध्यापेक्षा जास्त ओसरला तरी तालुक्यातील सर्व मोठ्या धरणांसह जिल्ह्यातील इतर धरणांची परिस्थिती चिंताजनक ...
विजय मानकर
सालेकसा : यंदाचा पावसाळा अर्ध्यापेक्षा जास्त ओसरला तरी तालुक्यातील सर्व मोठ्या धरणांसह जिल्ह्यातील इतर धरणांची परिस्थिती चिंताजनक आहे. ऑगस्ट महिन्यातच जलभराव करणारा दमदार पाऊस पडला नाही तर यंदा भीषण पाणी टंचाई व पाण्यासाठी हाहाकार माजल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आतापर्यंत पडलेल्या पावसातून आणि आजघडीला धरणातील उपलब्ध जलसाठा पाहून मिळत आहे.
आजघडीला शेतीला पावसाची नितांत गरज असूनही पाऊस पडला नाही. त्यामुळे पुजारीटोला धरणातून दोन्ही कालव्यांना पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे धरण झपाट्याने रिकामे होत चालले आहे. २-४ दिवसांत पाऊस पडला नाही तर पुजारीटोला धरण तळ गाठल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आजघडीला पावसाने मोठी चिंता वाढविली आहे. शनिवारी (दि. १४) घेतलेल्या दैनिक तलाव पाणी पातळी व उपलब्ध साठा अहवालानुसार सिरपूर धरणात २५.९९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध असून फक्त १६.२७ टक्के पाणी संग्रहित आहे. पुजारीटोला धरणात १९.०४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून ४३.७४ टक्के भरला आहे. या जलाशयात ७ ऑगस्ट रोजी ६२ टक्के जलसाठा उपलब्ध होता. परंतु शेतीला पाणी देण्याची मागणी झाली आणि कालवे सुरू करण्यात आले. त्यामुळे दररोज ८ दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग होत आहे. परिणामी अवघ्या ८ दिवसांतच पूर्ण जलाशय रिकामे होण्याच्या वाटेवर आहे.
कालीसराड धरणात फक्त ०२.४७ दशलक्ष घनमीटर पाणी असून आतापर्यंत फक्त ९.५० टक्केच जलसाठा झालेला आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागाला सुजलाम सुफलाम करणारा इटियाडोह धरण ९८.४६ दलघमी भरलेला असून येथे ३०.९७ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. वैनगंगेवरील संजय सरोवर धरण मध्य प्रदेशात असले तरी त्याचा लाभ महाराष्ट्रालासुद्धा मिळतो. या धरणात आजघडीला २०७.११ दलघमी जलसाठा असून ५०.५१ टक्के भरलेला आहे. विदर्भाच्या तुलनेत मध्य प्रदेशात पाऊस खूप जास्त आल्याने संजय सरोवर धरणाची पाण्याची पातळी समाधानकारक आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अधूनमधून मोठा जलभराव करणारा किंवा पूरसदृश परिस्थिती निर्माण करणारा पाऊस पडतो. हा पाऊस एकीकडे धान पिकाला भरपूर पोषक ठरतो. परंतु त्याचबरोबर वेगवेगळ्या नद्यांवर असलेल्या धरणातसुद्धा पाणी संग्रहित होते. त्याचा फायदा वर्षभर विविध कामांसाठी घेता येतो. परंतु जिल्ह्यासह विदर्भात यंदा पावसाने दमदार हजेरी लावलीच नाही. रिपरिप पावसाच्या भरवशावर यंदा धान व इतर पिकांची पेरणी आणि रोवणी करण्यात आली. काही ठिकाणी तर पावसाअभावी रोवण्या झाल्याच नाही. शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून हा मोठा चिंतेचा विषय आहे.
----------------------------
यंदा धरणांमध्ये जलसाठा नाहीच
दरवर्षी १४ ऑगस्टपर्यंत सरासरी ज्या धरणांमध्ये जलसाठा संग्रहित होतो त्यामध्ये सिरपूर धरणात सरासरी ५४.३० दलघमी असतो, यंदा २५.९९ दलघमी असून १७.१४ दलघमी साठा कमी आहे. पुजारीटोला धरणात सरासरी २५.०९ जलसाठा असतो, यंदा १९.०४ दलघमी असून ०६.५० दलघमी पाणीसाठा कमी आहे. कालीसराड धरणाची सरासरी ११.७१ असून यंदा फक्त ०२.४७ दलघमी असून ९.२४ दलघमी कमी जलसाठा आहे. संजय सरोवरमध्ये मात्र सरासरीपेक्षा १९.२९ दलघमी जलसाठा जास्त आहे. इटियाडोह धरणाची सरासरी ११५.६० दलघमी असून यंदा ९८.४६ दलघमी जलसाठा असून १७.१४ दलघमी पाणी कमी संग्रहित झाले आहे. साधारणपणे दरवर्षी पावसाळ्यात ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत धरणाची गेट उघडण्याची परिस्थिती निर्माण होते किंवा ओव्हरफ्लो निर्माण होतो. परंतु यंदा १४ ऑगस्टपर्यंत जलाशयांमध्ये इनफ्लोसुद्धा बंद असल्यामुळे जलाशयात पाण्याची पातळी वाढताना दिसत नाही.
----------------------
कोट...
पुढे दमदार पाऊस पडल्यावरच धरणामध्ये पुरेसा जलसाठा संग्रहित होऊ शकतो. सध्या धानपिकाला पाण्याची गरज असल्याने फक्त पुजारीटोला धरणाचे पाणी कालव्याद्वारे वापरले जात आहे. पावसाचे दिवस पुरेसे उरले आहेत. त्यामुळे धरणात जलसाठा होण्यापुरता पाऊस येण्याची पुरेपूर शक्यता आहे.
- प्रियम शुभम,
शाखा अभियंता,
बाघ इटियाडोह पाटबंधारे विभाग, आमगाव