नव्वदीनंतरही आत्मविश्वास दांडगा, ९४ वृद्धांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:20 AM2021-06-10T04:20:39+5:302021-06-10T04:20:39+5:30
गोंदिया : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत तरुण आणि ५० ते ६० वयोगटातील नागरिक सर्वाधिक बाधित झाले आहेत. याच लाटेत ...
गोंदिया : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत तरुण आणि ५० ते ६० वयोगटातील नागरिक सर्वाधिक बाधित झाले आहेत. याच लाटेत ९० वर्षांवरील ९६ वृद्धांना कोरोनाची लागण झाली. यापैकी नव्वदीनंतर जगण्याचा आत्मविश्वास आणि त्याच ऊर्मीच्या बळावर जिल्ह्यातील ९० वर्षांवरील ९४ बाधितांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली, तर दोन बाधितांचा मृत्यू झाला. ५० ते ६० या वयाेगटातील ४३९८ जण कोरोनाबाधित झाले. यापैकी ९० जणांचा मृत्यू झाला, तर ४३०८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. नव्वदीनंतर कोरोनावर मात करून वृद्धांनी आजच्या तरुण पिढीसमोर आदर्शच ठेवला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन, डॉक्टरांचा सल्ला आणि योग्य औषधोपचार आयुर्वेदिक औषधांचे सेवन आणि कोरोनावर मात करण्याच्या दृढ विश्वासाच्या बळावर यशस्वीपणे कोरोनावर मात केली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ९० वर्षांवरील वृद्धांना कोरोनाचा संसर्ग झाला होता, तर २ वृद्धांचा मृत्यू झाला. ९० वर्षांवरील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण जिल्ह्यात नगण्य आहे, तर ५० ते ६० वयोगटातील १६० जणांचा मृत्यू झाला आहे.
.................
५० ते ६० वयोगटात सर्वाधिक मृत्यू
- कोरोनाच्या पहिल्या लाटेत ५० ते ६० वयोगटातील एकूण २६१ जण बाधित झाले होते. यापैकी ३६ रुग्णांचा मृत्यू झाला होता.
- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ५० ते ६० वयोगटातील एकूण ४३९८ जण बाधित झाले. यापैकी १६० जणांचा मृत्यू झाला.
- पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा विचार करता जिल्ह्यात ५० ते ६० या वयोगटातील सर्वाधिक बाधित आढळले असून, मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.
- कोरोनावर मात करण्यात ज्येष्ठांपेक्षा वयोवृद्ध नागरिक अधिक तंदुरुस्त असल्याचे दिसून येते.
.................
आम्हाला कोणीच हरवू शकत नाही....
कोणताही आजार झाला तरी आपला आत्मविश्वास ढळू देऊ नका, अन्यथा तो आजार तुमच्यावरच भारी होतो. सकारात्मक दृष्टिकोन आणि वेळीच उपचार घेऊन मी ९१ व्या वर्षी कोरोनावर यशस्वीपणे मात केली.
- पुरुषोत्तम चलाख, वृद्ध
............
मला वयाच्या ९२ व्या वर्षी कोरोनाचा संसर्ग झाला. त्यामुळे कुटुंबातील व्यक्ती खूपच घाबरल्या होत्या. मात्र, मी माझा आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही. मी यातून नक्कीच बरा होईल, हा आत्मविश्वास मनाशी बाळगला आणि बरा झालो.
- रामाजी शेंडे, वृद्ध,
.................
९० पेक्षा जास्त वयाचे एकूण पॉझिटिव्ह : १०७
बरे झालेल्यांची संख्या : १०३
.............
अशी आहे आकडेवारी
पहिली लाट - १३ पाॅझिटिव्ह
दुसरी लाट - ९० पाॅझिटिव्ह
..............
मृत्यू
पहिली लाट -२
दुसरी लाट -२
...............