कडाक्याच्या थंडीतही मतदानाचा उत्साह कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 05:00 AM2021-12-22T05:00:00+5:302021-12-22T05:00:12+5:30
मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी उमेदवार आणि सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मदत करताना दिसून आले. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक ही स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याने या निवडणुकीबद्दल सर्वांनाच उत्साह असतो. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील मतदान केंद्रांवर सकाळपासून गर्दी दिसून आली. थंडीमुळे सकाळी ९ वाजल्यानंतर मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत काही केंद्रांवर गर्दी होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ओबीसी प्रवर्गाच्या ३० जागा वगळून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मंगळवारी (दि. २१) मतदान घेण्यात आले. जिल्हा परिषदेसाठी सरासरी ६५ टक्के मतदान झाले. सकाळपासूनच मतदान करण्यासाठी मतदारांनी मतदान करण्यासाठी गर्दी केली होती. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानात सातत्याने घट होत असल्याने याचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पण कडाक्याच्या थंडीतही मतदारांमध्ये मतदानासाठी उत्साह कायम असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
मंगळवारी मतदानाच्या दिवशीचे चित्र पाहता ग्रामीण भागात सर्वच केंद्रांवर महिलांची गर्दी जास्त दिसत होती. अगदी नवतरुण मतदारांपासून ते शंभरी गाठलेल्या वृद्धांनीही उत्साहाने मतदानाचा हक्क बजावला. महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव असल्यामुळे मतदानात महिलांचा उत्साह दिसून आला. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी उमेदवार आणि सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मदत करताना दिसून आले. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक ही स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याने या निवडणुकीबद्दल सर्वांनाच उत्साह असतो. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील मतदान केंद्रांवर सकाळपासून गर्दी दिसून आली. थंडीमुळे सकाळी ९ वाजल्यानंतर मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत काही केंद्रांवर गर्दी होती. जिल्ह्यात मतदानादरम्यान कुठल्याच मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडला नाही. सर्वच केंद्रांवर मतदान सुरळीतपणे पार पडले. नक्षलग्रस्त भागात मतदानासाठी तैनात कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारची सुरक्षा देण्यात आली होती. तसेच ३५ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली होती.
९३ वर्षीय दिव्यांगाचे मतदान
nगबोंडगावदेवी: होऊ घातलेल्या बोंडगावदेवी पंचायत समिती गणाच्या निवडणुकीत सिलेझरी येथील सीताराम नेवू ब्राम्हणकर या ९३ वर्षीय दिव्यांगांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. सिलेझरी येथील मतदान क्रमांक ४९/४१ या केंद्रावर येऊन वयोेवृद्ध असलेल्या सीताराम ब्राम्हणकर या ९३ वर्क्षीय दिव्यांगांनी आपले मतदान केले.
नक्षलग्रस्त भागात चांगला प्रतिसाद
- जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत नक्षलग्रस्त भागात मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते दुपारी ३ पर्यंतच ठेवली होती. तरीही त्या केंद्रांवर नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत मतदानाची आकडेवारी कमी पडू दिली नाही. आमगाव, देवरी व सालेकसा या तिन्ही तालुक्यांतील संपूर्ण मतदान केंद्र तसेच अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील झाशीनगर, गोठणगाव, बाराभाटी, ताडगाव, महागाव, केशोरी, भरनोली आणि सडक-अर्जुनी तालुक्यातील चिखली, कोकणा जमी, शेंडा व येथील मतदान केंद्रांवर दुपारी ३ पर्यंत मतदान झाले.
खातिया केंद्रावर ईव्हीएम पडली बंद
- गोंदिया तालुक्यातील खातिया येथील क्र. ११४ मतदान केंद्रावर काही मतदारांचे मतदान झाल्यानंतर ईव्हीएम बंद पडली. त्यामुळे थोडा वेळ मतदान थांबविण्यात आले. त्यानंतर नवीन ईव्हीएम मशीन आणून पुन्हा मतदानाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र बंद पडलेल्या ईव्हीएम मशीनमधील मते सुरक्षित राहतील की तेवढ्या मतदारांना पुन्हा मतदानाची संधी दिली जाईल, याबाबत मतदारांनी शंका व्यक्त केली.
दिव्यांगांना झाली मदत
- मतदानासाठी मतदान केंद्रावर येणाऱ्या दिव्यांगांची गैरसोय होऊ नये यासाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे मतदान केंद्रावर त्यांची गैरसोय झाली नाही. दिव्यांगांच्या नातेवाइकांनी त्यांना केंद्रावर नेऊन मतदान करण्यास मदत केली.