माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या ठेचा, वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:21 AM2021-07-20T04:21:06+5:302021-07-20T04:21:06+5:30
गोंदिया : ग्रामीण असो वा शहरी भाग या दोन्ही भागांत अजूनही काही पूर्वापार चालत आलेल्या रुढी, पंरपरा जाेपासल्या जातात. ...
गोंदिया : ग्रामीण असो वा शहरी भाग या दोन्ही भागांत अजूनही काही पूर्वापार चालत आलेल्या रुढी, पंरपरा जाेपासल्या जातात. त्यातच आषाढी एकादशीची प्रथा आजही तेवढ्याच उत्साहाने जोपासली जात असल्याचे चित्र अजूनही कायम आहे. या दिवशी नवविवाहितांना माहेरी आणले जाते. मुलींनासुद्धा माहेरी जाण्याची प्रचंड ओढ असते. मात्र, कोरोनामुळे मागील दीड वर्षांनी बऱ्याच नवविवाहितांना माहेरी जाता आले नाही. यामुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडले. मात्र, कोरोना संसर्ग काळात नियमांचे पालन करणेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. ज्या मुलींचे दूर अंतरावर विवाह झाले, अशा बहुतांश नवविवाहितांना कोरोना महामारीमुळे मागील वर्षी माहेरी जाता आले नव्हते. तेव्हा कडक निर्बंध होते शिवाय स्वत:सह कुटुंबीयांच्या आरोग्याचीसुद्धा काळजी होती. त्यामुळे जोखीम पत्करून प्रवास करण्यास फारसे कुणी तयार नव्हते. मात्र, आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून निर्बंधसुद्धा बऱ्याच प्रमाणात शिथिल आहेत, तर आंतरजिल्हा प्रवासालासुद्धा परवानगी आहे. त्यामुळे यंदा नवविवाहितांना आषाढीला माहेरी जाता येणार आहे. त्यामुळे त्यांनासुद्धा आता माहेरी जाण्याची ओढ लागली आहे, तर आईसुद्धा मुलीच्या भेटीला आतुर झाली आहे. आषाढ महिन्यात प्रत्येक विवाहिता माहेरी जात असते. फार पूर्वीपासून ही प्रथा सुरू आहे. आषाढीला मुलगी घरी आली की, आनंदाचे वातावरण असते.
.................
कोरोनामुळे सासरी झाली आषाढी
माझे माहेर नागपूरचे आहे ,तर सासर गोंदियाचे आहे. माझ्या नवऱ्याची नोकरी येथेच असल्याने आम्ही येथेच राहतो. मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे आखाडीसाठी मला माहेरी जाता आले नाही. त्यामुळे येथेच आषाढी साजरी करावी लागली. कुटुंबांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नियमांचे पालन करणेसुद्धा तेवढेच गरजेचे होते.
- स्नेहा मस्के,
..................
सर्व सण घरच्या घरी केले साजरे
मागील वर्षी कोरोनाचा संसर्ग सर्वत्र होता. त्यातच दीड वर्षभर कोरोनाचा प्रादुर्भाव राहिल्याने सर्वच सण घरच्या घरी साजरे करावे लागले, तर काही सणांवर कोरोनामुळे विरजण पडले. नवविवाहितांसाठी आखाडी हा आनंदाचा सण असतो. या निमित्ताने माहेरी जाता येते. त्यामुळे मुलीसह आईलासुद्धा मुलीला भेटण्याची आतुरता असते. यंदा मात्र काही प्रमाणात निर्बंध शिथिल असल्याने माहेरी जाता येणार आहे.
- मीनाक्षी पटले,
.................
आषाढी सासरीच
माझे लग्न याचवर्षी मार्च महिन्यात झाले. माझे गोंदिया सासर आहे. तर माहेर मूल येथील आहे. कोरोनाचा संसर्ग अजूनही काही प्रमाणात आहे, तर शासनाने काही प्रमाणात निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळणे आवश्यक असून मी आखाडी सासरीच साजरी करणार आहे.
- प्रणाली तेलसे,
.........
मागील वर्षी मुलीला येता आले नाही
मागील वर्षी मार्च महिन्यापासूनच सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव होता, तर जून ते सप्टेंबर महिन्यादरम्यान रुग्ण संख्या झपाट्याने वाढत होती. शासनानेसुद्धा कडक निर्बंध लागू केले होते. त्यामुळे अशा स्थितीत प्रवास करणे म्हणजे कोरोनाला निमंत्रण देण्यासारखे होते. त्यामुळे माझ्या मुलीने आखाडी सासरीच साजरी केली. हा सण सासर आणि माहेरच्या आनंदासाठी असतो.
- सविता डोमकावळे.
.............
कोरोना काळात विवाहांची नोंद
२०२० : १०९२
२०२१ : ३४३