अखेर भाजपाच्या बंडखोरांनी घेतली माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2021 05:00 AM2021-12-16T05:00:00+5:302021-12-16T05:00:06+5:30

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज करताना बंडखोरांनी आपले अर्ज भरून भाजपला चांगलेच अडचणीत आणले होते. परंतु शेवटच्या दिवशी सर्व बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता तालुक्यात झालीया आणि पिपरिया जिल्हा परिषद क्षेत्रात तिरंगी लढत होत असून तिरखेडी आणि कारूटोला क्षेत्रात थेट लढत रंगण्याचे चित्र दिसत आहेत.

Eventually the BJP rebels withdrew | अखेर भाजपाच्या बंडखोरांनी घेतली माघार

अखेर भाजपाच्या बंडखोरांनी घेतली माघार

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा :  येत्या २१ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तालुक्यात झालीया आणि तिरखेडी जिल्हा परिषद क्षेत्रात भारतीय जनता पक्षामध्ये इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी करीत पक्षाला अडचणीत आणण्याचे काम केले होते. परंतु वरिष्ठ नेत्यांच्या विनंतीवरून बंडखोरांनी अखेर माघार घेतली आहे. यात झालीया जि.प. क्षेत्रातून प्रतिभा परिहार आणि तिरखेडी जि.प. क्षेत्रातून योगेश (संजू) कटरे आणि परसराम फुंडे यांनी पक्षाच्या उमेदवारीसाठी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे. त्यामुळे भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज करताना बंडखोरांनी आपले अर्ज भरून भाजपला चांगलेच अडचणीत आणले होते. परंतु शेवटच्या दिवशी सर्व बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता तालुक्यात झालीया आणि पिपरिया जिल्हा परिषद क्षेत्रात तिरंगी लढत होत असून तिरखेडी आणि कारूटोला क्षेत्रात थेट लढत रंगण्याचे चित्र दिसत आहेत. झालीया जि.प. क्षेत्रात शिवसेनेच्या उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे या ठिकाणी आता भाजप- काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. तर तिरखेडी आणि कारूटोला क्षेत्रात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत रंगतांना दिसत आहे.
झालीया जि.प. क्षेत्रात उमेदवारीसाठी प्रतिभा परिहार, धर्मशीला सुलाखे आणि संगीता कुराहे या तिघा प्रबळ दावेदार असताना पक्षांची सुलाखे यांना उमेदवारी जाहीर करताच  परिहार यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज केला होता. परंतु शेवटी पक्षश्रेष्ठींच्या विनंतीवरून त्यांनी आपली माघार घेतली. त्यामुळे आता या क्षेत्रात भाजपच्या सुलाखे, काँग्रेसचे छाया नागपुरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवकी नागपुरे या तिघांमध्ये सामना रंगणार आहे. तिरखेडी क्षेत्रात सुद्धा भाजपमध्ये तीन उमेदवार दावेदारी ठोकत होते. 
सर्वसाधारण साठी खुल्या जागेवर पक्षाने एका महिलेला उमेदवार बनविले असून त्याविरोधात योगेश कटरे आणि परसराम फुंडे यांनी बंडखोरी करीत अर्ज केला होता. परंतु शेवटी पक्षाने वर्षा बिसेन यांना उमेदवारी दिली व बंडखोरांना समजविल्याने बंडखोरांनी अर्ज मागे घेतला. या क्षेत्रात आता भाजपच्या वर्षा बिसेन आणि काँग्रेसच्या विमल कटरे यांच्यात थेट लढत रंगणार असल्याचे चित्र दिसत आहे. 
कारूटोला जि.प. क्षेत्रात काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच असताना काँग्रेसने माजी जि.प. सभापती लता दोनोडे यांची उमेदवारी कापून वंदना काळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे दोनोडे यांचे समर्थक कमालीचे नाराज झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसचा गड असलेल्या क्षेत्रात यावेळी भाजपच्या टीना चुटे आणि काँग्रेसच्या काळे यांच्यात सरळ लढत होतानाचे चित्र आहे. 
तालुक्यात चारही जिल्हा परिषद क्षेत्रात भाजप आणि काँग्रेस तर दोन जिल्हा परिषद क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने उतरली असून निवडणुकीत कोणाचे पारडे जड आहे, असे हमखास कोणी बोलताना दिसत नाही.
 

जि.प.चे आठ आणि पं.स.चे नऊ अर्ज मागे
- अर्ज मागे घेण्याच्या दिवशी एकूण चार जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये आठ उमेदवारांनी तर आठ पंचायत समिती क्षेत्रामध्ये नऊ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यामध्ये झालीया क्षेत्रातून प्रतिभा परिहार आणि भुमेश्वरी बोपचे यांचा समावेश आहे. पिपरिया क्षेत्रातून दुर्गा लाडेकर यांनी आपला अर्ज मागे घेतला. तिरखेडी क्षेत्रातून योगेश कटरे, योगेश्वरी पारधी, परसराम फुंडे आणि दिलीप बिसेन यांनी अर्ज मागे घेतला. कारुटोला क्षेत्रातून चेतना टेंभरे यांनी अर्ज मागे घेतला. याशिवाय पंचायत समितीच्या एकुण आठ क्षेत्रांपैकी एक ओबीसी जागा वगळल्यामुळे सध्या सात पं.स. क्षेत्रात निवडणूक होऊ घातली आहे. यात झालीया आणि टोयागोंदी क्षेत्रातून कोणताही अर्ज मागे घेण्यात आला नाही. तर सोनपुरी क्षेत्रातून भेंगराज बावनकर, पिपरिया क्षेत्रातून खुशालदास रतोने आणि भरत लिल्हारे या दोघांनी अर्ज मागे घेतला. तिरखेडी पं.स.क्षेत्रातून सुशीला मडावी आणि मंजू हरिणखेडे यांनी अर्ज मागे घेतला. कावराबांध क्षेत्रातून शैलेंद्र मडावी यांनी तर लोहारा क्षेत्रातून वनिता टेंभरे, शालिनी टेंभुर्णीकर आणि साधना भेंडारकर या तिघांनी आपला अर्ज मागे घेतला. एकूण ५ क्षेत्रांतील नऊ उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला.

 

Web Title: Eventually the BJP rebels withdrew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.