अखेर गराडा प्राथमिक शाळा पूर्ववत सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 11:34 PM2018-02-07T23:34:38+5:302018-02-07T23:34:59+5:30
पंचायत समिती गोरेगाव अंतर्गत येणाऱ्यागराडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ३ जानेवारीला स्थानिक शिक्षण विभागाने कुलूप लावले. याचा निषेध करीत पालकांनी थेट शिक्षण मंत्र्यांनाच पत्र पाठवून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता.
दिलीप चव्हाण ।
ऑनलाईन लोकमत
गोरेगाव : पंचायत समिती गोरेगाव अंतर्गत येणाऱ्यागराडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ३ जानेवारीला स्थानिक शिक्षण विभागाने कुलूप लावले. याचा निषेध करीत पालकांनी थेट शिक्षण मंत्र्यांनाच पत्र पाठवून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. लोकमतने हा मुद्दा लावून धरला. त्यामुळे शिक्षण विभागाने ६ फेब्रुवारी रोजी शाळा बंद प्रकरण चिघळत असल्याचे पाहून गराडा प्राथमिक शाळा पूर्ववत सुरू करण्याचे आदेश दिले. शाळा सुरु झाल्याचे कळताच गावकरी व पालकांनी लोकमतचे आभार मानले.
प्राप्त माहितीनुसार शासनाच्या शिक्षण विभागाने ऐन सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी गराडा येथील शाळा बंद केली. या शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांचे मुंडीपार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत समायोजन केले होते. मात्र मुंडीपार प्राथमिक शाळा गराडापासून तीन कि.मी.अंतरावर असल्यामुळे पहिली व दुसरीचे विद्यार्थी शाळेत पायी कसे जातील. असा प्रश्न उपस्थित करीत मुलांना शाळेतच न पाठविण्याचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे मागील ३५ दिवसांपासून गराडा येथील ११ विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होते. यासंदर्भांत पालकांनी शिक्षण विभागाच्या विरोधात रोष व्यक्त केला. गावातील शाळा बंद करु नये, असा प्रस्ताव पारीत करुन जि.प. शिक्षण विभागाकडे पाठविला. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र देवून शाळा बंद न करण्याची विनंती केली. मात्र प्रशासनाने नियम पुढे करीत व वरुनच आदेश असल्याचे सांगत गराडा शाळा बंद केली. महिनाभराचा कालावधी लोटूनही प्रशासनाने यावर तोडगा काढला नाही. त्यामुळे गराडा येथील पालकांनी थेट शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहून आमरण उपोषणाचा इशारा दिला. शेवटी प्रशासनाने निर्णय मागे घेत प्राथमिक शाळा गराडा सुरु करण्याचे मौखीक आदेश दिले. तर गराडा शाळेतील आनंद गौपाले व अनिता तुरकर या दोन्ही शिक्षकांना गराडा शाळेत पूर्ववत करण्यात आले. अखेर गराडा येथील गावकºयांच्या एकजुटीेचा विजय झाला.
शासन व प्रशासनाने सुरूवातील स्थानिक विद्यार्थी आणि पालकांच्या समस्येकडे दुर्लक्ष करुन येथील शाळा बंद केली होती. मात्र गावकºयांची एकजुट आणि लोकमतच्या पाठपुराव्यामुळे शाळा पूर्ववत सुरू झाली.
-शशेंद्र भगत,
सरपंच, गराडा
.................................
गराडा येथील विद्यार्थी शाळाबाह्य होवू नये, विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये, म्हणून जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार गराडा प्राथमिक शाळा सुरु करण्याचे मौखीक आदेश देण्यात आले.
-यशवंत कावळे,
गटशिक्षणाधिकारी पं.स. गोरेगाव