अखेर कंत्राटी कर्मचाऱ्याचा हृदयघाताने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:30 AM2021-01-19T04:30:52+5:302021-01-19T04:30:52+5:30
गोंदिया : मागील १०-१२ वर्षांपासून कंत्राटी कर्मचारी म्हणून सेवा दिली. आता शासन सगळ्या पदांचे आऊटसोर्सिंग करीत आहेत. त्यामुळे आपली ...
गोंदिया : मागील १०-१२ वर्षांपासून कंत्राटी कर्मचारी म्हणून सेवा दिली. आता शासन सगळ्या पदांचे आऊटसोर्सिंग करीत आहेत. त्यामुळे आपली नोकरी जाईल या विवंचनेत जिल्हा परिषदेतील स्वच्छ भारत मिशन कक्षात कार्यरत कंत्राटी कर्मचारी देवानंद बोपचे (४१) यांचे शुक्रवारी (दि. १५) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. घरी तथा गावातील मित्रांकडे ते सारखे फेब्रुवारी महिन्यात नोकरी जाण्याविषयी बोलत असल्याचे त्याची पत्नी रेखा बोपचे आणि भाऊ प्रकाश बोपचे यांचे म्हणणे आहे.
शासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती केल्यानंतर साधारणत: १६ ते १७ वर्षांपासून विविध विभागात कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या कंत्राटी कर्मचाऱ्यांची शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी आहे. मात्र, शासनस्तरावरून कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याऐवजी त्यांचे पद बाह्यसंस्थेच्या माध्यमातून भरण्याचा घाट घालण्यात आला आहे. जुलै महिन्यात शासनस्तरावरून जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन आणि तालुकास्तरावरील गट संसाधन केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त करण्याचे पत्र काढण्यात आले. कंत्राटी कर्मचारी या विरोधात न्यायालयात गेले. राज्यातील विविध मंत्री व आमदारांना याविषयी निवेदने देण्यात आली. त्यामुळे शासनाने तात्पुरत्या स्वरूपात जुुलै महिन्यातील पत्राला स्थगिती दिली. मात्र, जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पदांना मंजुरी दिल्यानंतर सर्व पद बाह्यसंस्थेच्या माध्यमातून भरण्याचे शासनाचे पत्र आले. शिवाय गेल्या १६ ते १७ वर्षांपासून कार्यरत पदांना व्यपगत करण्याचासुध्दा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आपले पद जाणार व मुलांच्या शिक्षणाचे काय होईल, कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शासनाने सर्व भरती प्रक्रिया बंद केल्याने नव्याने नोकरी कुठून शोधणार, आता वयाच्या एक उंबरठा पार पडला, त्यामुळे शासकीय नोकरीची वयोमर्यादा गेल्याने आपले कुटुंब उघड्यावर येईल अशा विवंचनेत देवानंद बोपचे होते. अनेक मित्रांकडे माझी नोकरी जाणार असल्याचेच बोलत असल्याचे त्यांचे मित्र व गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
एका कंत्राटी सहकारी मित्राच्या अचानक झालेल्या निधनामुळे संपूर्ण राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांतून रोष व्यक्त करण्यात येत आहे. उल्लेखनीय म्हणजे, कंत्राटी कर्मचारी अत्यंत तुटपुंज्या वेतनावर कार्यरत आहेत. त्यातच त्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनस्तरावर कोणतेच पाऊल उचलले जात नाही. देवानंद बोपचे यांच्या अकाली निधनामुळे त्यांचे दोन मुले आणि पत्नी उघड्यावर आली असून त्यांच्या जीवनयापनाचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे.
----------------
कर्मचाऱ्यांत असा भेद का?
पदभरती करण्यात येत नसल्यामुळे अनेक होतकरू तरुण कंत्राटी पदावर नोकरीला तयार होतात. त्यांना अल्प मानधन दिले जाते. कामाचा प्रचंड व्याप, नोकरीतील असुरक्षितात, वरिष्ठांची मर्जी सांभाळणे, नोकरी गेल्यास भविष्यातील निर्वाहाची समस्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पाचविलाच पुजलेली आहे. विशेष म्हणजे, शासनाने १४ जानेवारी रोजी परिपत्रक काढून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ केली. तर दुसरीकडे कायम करण्याची मागणी करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पद व्यपगत करून त्यांना बाह्यसंस्थेच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचे वेतन अर्ध्यावर येईल. शिवाय नोकरीसुध्दा बेभरवशाची राहणार आहे. आपल्याच दोन कर्मचाऱ्यांत असा भेद का करण्यात येत आहे, असा सवाल कंत्राटी कर्मचाऱ्यांतून केला जात आहे.