अखेर केशोरी येथील सार्वजनिक पथदिवे झाले प्रकाशमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:31 AM2021-09-26T04:31:12+5:302021-09-26T04:31:12+5:30
केशोरी: पथदिव्यांच्या थकीत देयकाचा भरणा ग्रामपंचायत करणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेऊन सरपंच सेवा संघाने आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या ...
केशोरी: पथदिव्यांच्या थकीत देयकाचा भरणा ग्रामपंचायत करणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेऊन सरपंच सेवा संघाने आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या अर्जुनी-मोरगाव स्थित जनसंपर्क कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. या ठिय्या आंदोलनाची आ. चंद्रिकापुरे यांनी दखल घेऊन विद्युत वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रातील सार्वजनिक पथदिव्यांचा विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू करण्याचा तोडगा काढला. त्यामुळे तालुक्यासह केशोरी येथील सार्वजनिक पथदिवे प्रकाशमान होताच रात्रीच्या वेळेस शतपावली करणाऱ्यांची संख्या वाढल्याचे चित्र आहे.
तालुक्यातील अनेक गावासह केशोरी येथील सार्वजनिक पथदिव्यांचा वीज पुरवठा थकीत वीज बिलाचा भरणा करण्याची सबब पुढे करून विद्युत वितरण कंपनीने गेल्या तीन महिन्यापासून खंडित केला होता. तेव्हापासून नागरिकांना अंधाराचा सामना करण्याची वेळ आली होती. शासनाने १५ व्या वित्त आयोगाच्या प्राप्त निधीतून ग्रामपंचायतीने २०१८ पासून असलेला पथदिव्यांचा थकीत वीज बिलाचा भरणा करावा, असे आदेश निर्गमित केले होते. त्या आदेशाविरोधात तालुका सरपंच सेवा संघाने पथदिव्यांचे थकीत विद्युत बिल ग्रामपंचायत भरणार नाही असा आक्रमक पवित्रा घेऊन आ. मनोहर चंद्रिकापुरे यांच्या अर्जुनी-मोरगाव स्थित जनसंपर्क कार्यालयासमोर भजन, गायन करुन ठिय्या आंदोलन सुरू केले होते. त्या आंदोलनाची आमदार चंद्रिकापुरे यांनी त्वरित दखल घेऊन विद्युत वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून थकीत विद्युत बिल भरण्यावर तोडगा काढल्यामुळे तालुक्यासह केशोरी येथील सार्वजनिक पथदिवे (दि.२४) पासून सुरू करण्यात आले आहेत. संपूर्ण गाव प्रकाशमान होताबरोबर रात्रीच्या वेळेस शतपावली करणाऱ्या नागरिकांची गर्दी दिसून आली.