अखेर जि.प.शाळेचे छत कोसळले

By admin | Published: August 9, 2016 01:06 AM2016-08-09T01:06:54+5:302016-08-09T01:06:54+5:30

लोकमतने १६ जुलै रोजी ‘विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात’ या शिर्षकाखाली बातमी प्रकाशित करून तिरोडा येथील

Eventually, the roof of the District School collapsed | अखेर जि.प.शाळेचे छत कोसळले

अखेर जि.प.शाळेचे छत कोसळले

Next

तिरोडा : लोकमतने १६ जुलै रोजी ‘विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात’ या शिर्षकाखाली बातमी प्रकाशित करून तिरोडा येथील जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेची इमारत कोसळण्याची शक्यता वर्तविली होती. तरीही संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे अखेर इमारत कोसळली. ही घटना सुटीच्या दिवशी झाल्याने प्राणहानी टळली.
तिरोडा येथे जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा, हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय त्यात पहिली ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेतात. सदर शाळेची इमारत संपूर्ण जीर्ण झाली असून ५० वर्ष जुनी आहे. अनेक वर्ग खोल्या मोडकळीस आल्या असून दरवाजे, खिडक्या, छत, फाटे आदी भंगारासारखे झाले आहे.
सदर शालेय इमारतीच्या जीर्ण अवस्थेची दखल घेऊन लोकमतने बातमी प्रकाशित केली होती. अखेर इमारत कोसळल्याने लोकमतचे भाकीत खरे ठरले. मात्र एवढी मोठी दुर्घटना होऊन जिल्हा प्रशासनातील एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याने किंवा कोणत्याही लोकप्रतिनिधीने सदर शाळेला भेट सुध्दा दिली नाही. जिल्हा परिषदेची शिक्षण विभागाप्रती किती आत्मीयता व आस्था आहे, हे दिसून येते.
श्रेय लाटण्यासाठी शिक्षकांवर अधिकाराचा दबावतंत्र वापरला जातो. त्यातच लहान शिक्षक माहिती कळवित नाही. दुर्लक्षपणा करतात, शिक्षणाच्या जाहिरातीवर, फोटोवर अधिकारी व लोकप्रतिनिधी कोट्यावधी रुपयाची उधळण करतात. विद्यार्थ्यांच्या प्रति त्यांच्या मनात आपुलकीच नाही असे सदर शाळेत सद्यस्थितीत पावसात सुरू असलेल्या शिक्षणावरून दिसून येते.
३० जुलै २०१६ रोजी सायंकाळी ५.१५ वाजता शालेय इमारत कोसळली. आज या घटनेला ८ दिवसाचा कालावधी लोटत आहे. परंतु शिक्षणाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची साधी दखल सुध्दा घेतली नाही. जीवित हानी झाली असती तर त्यांनी दखल घेतली असती का? असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. वर्ग ११ च्या खोलीला भेट दिली असता छतावरून पाणी खोलीत पडत होते. वर्गखोलीत पावसाचे पाणी साचले होते अन शिक्षक विद्यार्थ्यांना धडे शिकवित होते.
साचलेल्या पाण्यात विद्यार्थी शिक्षण घेत होते. अशाच दयनिय स्थितीत एखाद्या अधिकाऱ्याची व्यवस्था करण्यात आली असती तर चालले असते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. लोकप्रतिनिधी सुध्दा आपल्या कार्यालावर लाखो रुपये खर्च करतात. तेवढ्याच रकमेत किती तरी वर्ग खोल्या तयार झाल्या असत्या, पण त्याच्या मनात हा विचार रुजतो किंवा नाही, हे त्यांनाच ठाऊक.
मुख्याध्यापक एन.एस.रहांगडाले यांच्याशी चर्चा केली असता संपूर्ण वर्गखोल्याची व्यवस्था बघण्यास त्यांनी सांगितले. सदर प्रतिनिधीने वर्गेखोल्यांना भेट दिल्यावर कोणत्याही क्षणी कोणतीही वर्गखोली कोसळू शकते असे दिसून आले. अशावेळी जीवितहानी झाल्यास त्यासाठी कोण जबाबदार राहील, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. (प्रतिनिधी)

‘लोकमत’ने आणली होती परिस्थिती निदर्शनास
४विशेष म्हणजे या जीर्ण झालेल्या शाळेच्या इमारतीबद्दल ‘लोकमत’ने मागील महिन्यातच बातमी लावून ही बाब निदर्शनास आणून दिली होती. मात्र त्यानंतरही दखल न घेतल्याने ही परिस्थिती निर्माण झाली.

गटशिक्षणाधिकाऱ्यांचे आश्वासन हवेतच विरले
४तिरोड्याचे गटशिक्षणाधिकारी मांढरे यांनी सदर शाळेला भेट देऊन वर्ग पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना उत्तर बुनियादी प्राथमिक शाळेच्या रिकाम्या खोलीत बसविण्याचे आश्वासन दिले. तसेच वर्ग पाचवी ते बारावीसाठी तत्काळ प्रस्ता पाठवून भाडे तत्वावर किंवा रिकाम्या जि.प.शाळेसमोर असलेली इमारत उपलब्ध झाल्यास त्या ठिकाणी सोय करून देण्याची आस्था दाखविली. मात्र अद्याप कसलीही व्यवस्था होऊ शकली नाही.

जीर्ण इमारतीची सुधारणा करण्यात यावी किंवा नवीन वर्गखोल्या बांधून देण्यात यावे यासाठी ठराव व लेखीपत्र वरिष्ठांना अनेकदा दिले आहेत. आता इमारत कोसळल्यावरही पुन: शालेय इमारतीच्या जीर्णावस्थेची माहिती संबंधितांना देण्यात आली आहे. परंतु अद्याप कुणीही दखल घेतली नाही.
- एन.एस.रहांगडाले,
मुख्याध्यापक जि.प.कन्या शाळा, तिरोडा.

Web Title: Eventually, the roof of the District School collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.