अखेर आमगावला नगर परिषदेचा दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 12:44 AM2017-08-04T00:44:16+5:302017-08-04T00:45:04+5:30
आमगाव नगरपंचायतला नगर परिषदेला दर्जा देण्यात यावा. या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून संघर्ष समितीने लढा उभारला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : आमगाव नगरपंचायतला नगर परिषदेला दर्जा देण्यात यावा. या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून संघर्ष समितीने लढा उभारला होता. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून शासनाने आमगावला नगर परिषदेचा दर्जा देण्यात आल्याची अधिसूचना काल २ आॅगस्ट रोजी काढली. या निर्णयाने आमगाववासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
राज्य शासनाने राज्यातील अनेक तालुका पातळीवरील ग्रामपंचायतींना लोकसंख्या व ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्राचा समावेश करुन होणारे क्षेत्र यांचे नगर पंचायतीत समायोजन करुन नगर पंचायतची स्थापना २०१५ केली होती. परंतु, आमगाव येथील नागरिकांनी नगर पंचायत ऐवजी शासनाने नगर परिषदेचा दर्जा द्यावा अशी मागणी लावून धरली. यासाठी संघर्ष समितीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने शासनाने नगर परिषद स्थापनेचा निर्णय शासनाकडे सोपविला. परंतु, शासनाने मागील दोन वर्षांपासून यासंदर्भात कुठलाच निर्णय घेतला नव्हता.
निर्णयाअभावी नागरिकांना प्रशासकाच्या अनियंत्रीत कारभारामुळे विकासापासून वंचित राहावे लागले. संघर्ष समितीने शासनाकडे नगर परिषदेचा दर्जा देण्यात यावा. या मागणीसाठी अनेक पत्र व्यवहार व आंदोलनाची भूमिका घेतली होती. संघर्ष समितीने राजकीय नेते, लोकप्रतिनिधी यांनाही या संदर्भात सक्रिय सहभाग घेण्यासाठी प्रयत्न केले. अखेर शासनाने आमगाव नगर परिषद स्थापनेचा निर्णय घेत काल (दि.२) रोजी त्याची अधिसुचना काढली. शासनाने विकासाच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले.
विकासाकरिता संघर्ष कायम राहणार
आमगाव परिसरातील नागरिकांच्या मागणीला घेवून नगर परिषद करिता संघर्ष समितीचा लढा सुरू होता. नागरिकांना मुलभूत सोयी सुविधा आणि विकासासाठी नगर परिषद हा गतीशील पर्याय होता. यासाठी संघर्ष समितीने पुढाकार घेवून पाठपुरावा केला. आंदोलनाची भूमिका घेतली होती. याची दखल घेत शासनाने योग्य निर्णय घेतला. पुढे नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांना मुलभूत विकासाकरिता पुढाकार राहणार नाहे.
आठ ग्रामपंचायतीचा समावेश
आमगाव नगर परिषदेत आमगाव, बनगाव, रिसामा, कुंभारटोली, माल्ही, पदमपूर, किंडगीपार, बिरसी या आठ ग्राम पंचायतींना ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्रात समावेश करुन नगर परिषदची स्थापना करण्याचे परिपत्रक काढले.
नगर परिषदेच्या प्रशासकपदी तहसीलदार
शासनाने आठ ग्रामपंचायतींचा नगर परिषदेत समावेश केला. या ठिकाणी निवडणूक कार्यक्रमाची अंमलबजावणी व या गावातील विकासात्मक कार्य सुरळीतपणे चालविण्यासाठी प्रशासकपदी आमगावचे तहसीलदार साहेबराव राठोड यांच्याकडे कार्यभार सोपविला आहे.
लोकप्रतिनिधींचा यशस्वी पाठपुरावा
आमगाव नगर परिषद व्हावी, यासाठी नागरिकांच्या मागणीला घेवून आ. संजय पुराम, माजी आ. केशवराव मानकर यांनी हा विषय प्रतिष्ठेचा केला होता. शासनाने अखेर आमगाववासीयांच्या मागणीची दखल घेतली. यामुळे आमगावच्या विकासाला निश्चित दिशा मिळण्यास मदत होईल. यात आमगाव येथील अॅड. येशुलाल उपराडे, क्रिष्णा चुटे, राकेश शेंडे यांचीही भूमिका महत्त्वपूर्ण ठरली.