...अखेर त्या शिक्षकांची इतरत्र बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:36 AM2021-09-16T04:36:35+5:302021-09-16T04:36:35+5:30
बोंडगावदेवी : पंचायत समिती अर्जुनी मोरगाव अंतर्गत येणाऱ्या चान्ना बाक्टी येथील जिल्हा परिषद आदर्श वरिष्ठ प्राथमिक शाळेतील वादग्रस्त ठरलेल्या ...
बोंडगावदेवी : पंचायत समिती अर्जुनी मोरगाव अंतर्गत येणाऱ्या चान्ना बाक्टी येथील जिल्हा परिषद आदर्श वरिष्ठ प्राथमिक शाळेतील वादग्रस्त ठरलेल्या ‘त्या’ शिक्षकास हटवून इतरत्र समायोजन केल्याने शालेय व्यवस्थापन समितीने समाधान व्यक्त केले.
चान्ना येथील जि. प. प्राथमिक शाळेतील कार्यरत सहाय्यक शिक्षक पी. पी. मोहबंशी यांनी वर्ग वाटपावरून गावात असंतोष पसरविला होता. काही विद्यार्थ्यांच्या पालकांशी भेटून शाळेतून आपल्या पाल्याचे नाव काढा, असा अविवेकी चुकीचा संदेश देऊन शाळेतील विद्यार्थीसंख्या कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले. अनेक सबबीखाली सुट्यांवर जाणे असा मार्ग पत्करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस त्या शिक्षकांची वर्तणूक ठरत होती. शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी करणाऱ्या शिक्षकाला त्वरित हटविण्यात यावे, असा ठराव शालेय व्यवस्थापन समितीने संमत करून संबंधितांकडे आग्रही मागणी केली. ग्रामस्थांच्या मागणीची दखलच घेण्यात आली नाही. २३ ऑगस्टला ‘लोकमत’मध्ये चान्ना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील त्या शिक्षकाला हटवा अन्यथा शाळेला कुलूप ठोकणार या मथळ्याखाली बातमी प्रकाशित होताच पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने त्याची दखल घेतली. गटशिक्षणाधिकारी ऋषी मांढरे यांनी ग्रामस्थांच्या तक्रारीवरून वादग्रस्त शिक्षक पी. पी. मोहबंशी यांना त्या ठिकाणावरून त्वरित हटवून इतरत्र समायोजन करण्याचे आदेश काढले. त्यांच्या ठिकाणी शैक्षणिक कार्यासाठी देवलगाव येथे अतिरिक्त असलेले कापगते यांना रूजू करण्यात आले.