प्रत्येक गावाला मिळेल शुद्ध पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2017 12:15 AM2017-07-09T00:15:29+5:302017-07-09T00:15:29+5:30
पिण्याचे शुद्ध पाणी हे प्रत्येक नागरिकाचे हक्क आहे. अनेक वर्षांपर्यंत ग्रामीण भागातील महिला विहिरीतून पाणी भरत होत्या.
गोपालदास अग्रवाल : रायपूर येथे ४० लाखांच्या योजनेचे भूमिपूजन
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पिण्याचे शुद्ध पाणी हे प्रत्येक नागरिकाचे हक्क आहे. अनेक वर्षांपर्यंत ग्रामीण भागातील महिला विहिरीतून पाणी भरत होत्या. त्यानंतर हळूहळू बोअरवेलचा काळ आला. परंतु महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी मेहनत करावी लागत होती. त्यासाठी आम्ही प्रत्येक गावात पाणी पुरवठा योजना आणण्याचे उद्दिष्ट ठेवले. आज गोंदिया तालुक्यातील सर्वच गावांमध्ये पाणी पुरवठा योजनेचे मूळ स्वरूप तयार करण्यात आम्ही यशस्वी ठरलो, असे प्रतिपादन आ. गोपालदास अग्रवाल यांनी केले.
रायपूर येथे ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत ४० लाख रूपये खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेचे विस्तारीकरण व नविनीकरण बांधकामाचे भूमिपूजन आ. अग्रवाल यांच्या हस्ते, पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
आ. अग्रवाल पुढे म्हणाले, कुडवा-कटंगी गावांसाठी विशेष जलशुद्धीकरण केंद्राची स्थापना करून दोन्ही गावांमध्ये पाणी पुरवठा योजना तयार करून दिली. भविष्यात प्रत्येक गावात जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातूनच पाणी पुरवठा करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असे ते म्हणाले.
आपल्या अध्यक्षीय भाषणातून पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे यांनी, आ. अग्रवाल यांच्या नेतृत्वात गोंदिया पंचायत समिती प्रत्येक गावातील नागरिकापर्यंत व्ययक्तिक लाभाच्या योजना पोहोचविण्याचे कार्य करीत आहे. प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिकाला शौचालयासह घरकुलाचा लाभ देवून गोंदिया तालुका निर्मल तालुका बनविण्यासाठी कार्य करीत असल्याचे सांगितले.
याप्रसंगी प्रामुख्याने जि.प. सभापती पी.जी. कटरे, विमल नागपुरे, पं.स. उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, लुरेंद्र रहांगडाले, केवलचंद रहांगडाले, भोजराज चुलपार, पं.स. सदस्य प्रमिला करचाल, सरपंच कल्पना रहांगडाले, उपसरपंच डॉ. योगेश बिसेन, लक्ष्मी रहांगडाले, रूद्रसेन खांडेकर, जगतराय बिसेन, राखी कटरे, भुपेश रहांगडाले, रिना आंबाडारे, सविता बोरकर, चुन्नीलाल रहांगडाले, संजय घरडे, लोकचंद बिजेवार, जायत्रा पाचे, हरिचंद बिसेन, रूखदास दंदरे, हिरलाल पाचे, कुंवरलाल येडे, छगनलाल बिसेन, मोहन बिसेन, रामलाल रहांगडाले, सेवक भंडारी आदी उपस्थित होते.