प्रत्येक महिलांनी बचत करणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 10:21 PM2018-06-27T22:21:18+5:302018-06-27T22:22:06+5:30
विविध क्षेत्रात कार्य करीत असलेल्या अनेक महिलांनी आपल्या दैनंदिन जीवनात बचत करायला शिकावे. प्रत्येक महिलेने बचत करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. कांदबरी बलकवडे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : विविध क्षेत्रात कार्य करीत असलेल्या अनेक महिलांनी आपल्या दैनंदिन जीवनात बचत करायला शिकावे. प्रत्येक महिलेने बचत करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. कांदबरी बलकवडे यांनी केले.
महिला आर्थिक विकास महामंडळ गोंदिया व सहारा लोक संचालित साधन केंद्र सालेकसाद्वारे घेण्यात आलेल्या महिला कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक मेळाव्यात त्या बोलत होत्या.
हलबीटोला येथील अर्धनारेश्वरालयात सदर मेळावा पार पडला. आमदार संजय पुराम यांनी उद्घाटकीय भाषणातून महिलांना, महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुढाकार घ्यावा. स्वत:ला कमी लेखू नये. नारी शक्ती ही महान आहे, असे मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. सभापती लता दोनोडे, जि.प. सदस्य विजय टेकाम, जि.प. सदस्य दुर्गा तिराले, उपसभापती दिलीप वाघमारे, प्रतिभा परिहार, न.प. सभापती उमेदलाल जैतवार, गोविंदराव वरकडे, अग्रणी जिल्हा प्रबंधक दिलीप सिल्हारे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निरज जागरे, महिला आयोगाच्या जिल्हा समन्वयक रजनी रामटेके, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक बी.एम. शिवणकर उपस्थित होते.
मेळाव्यात बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तुंचे स्टॉल्स लावण्यात आले होते. सर्व महिलांची रक्त तपासणी सुद्धा करण्यात आली. तसेच गटाच्या महिलांना प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचे कर्ज वाटप आमदार तसेच जिल्हाधिकारी व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
बचत गटांच्या महिलांनी आदिवासी नृत्य, लावणी व नाटक सादर केले. महिलांच्या गर्दीने मेळाव्याचा उत्साह द्विगुणीत झाला. प्रास्ताविक माविमचे जिल्हा समन्वयक अधिकारी सुनील सोसे यांनी मांडले. संचालन शालू साखरे यांनी केले. आभार एम.ई. टेंभरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी बचत गटाच्या महिलांनी सहकार्य केले.