पोलीस आईसोबत आता रोज गमाडी गंमत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:31 AM2021-09-26T04:31:36+5:302021-09-26T04:31:36+5:30
गोंदिया : महिलांना पुरुषांपेक्षा अधिक वेळ कुटुंबाला द्यावा लागतो. आई, पत्नी म्हणून येणारी कर्तव्ये बजावत पोलीस महिलांची ड्यूटी करताना ...
गोंदिया : महिलांना पुरुषांपेक्षा अधिक वेळ कुटुंबाला द्यावा लागतो. आई, पत्नी म्हणून येणारी कर्तव्ये बजावत पोलीस महिलांची ड्यूटी करताना रात्री घरी परतण्याची वेळ निश्चित नसते. बऱ्याचदा रात्रपाळीतही काम करावे लागते. अशा वेळी मुलांना आईची उणीव जाणवते. तरीही मुलांच्या हट्टाला बाजूला सारून पोलीस खात्यातील ‘वूमेन वॉरिअर्स’ लेकरांना घरी ठेवून रात्री उशिरापर्यंत आपले कर्तव्य बजावित होत्या. शासनाने महिला पोलिसांना ड्यूटीत चार तासांची सूट देऊन फक्त आठच तास काम दिल्याने पोलीस मातांना आता आपल्या मुलाबाळांना वेळ देता येणार आहे.
कुटुंबाचीही जबाबदारी सांभाळताना नागरिकांची सेवा करताना दिसतात. कोरोनाच्या संकटात आरोग्य यंत्रणेसोबतच पोलीसही फ्रंटलाइन वॉरिअर म्हणून लढत आहेत. पोलीस ठाण्यातील इतर कामकाज सांभाळण्यापासून प्रतिबंधित क्षेत्रात शांतता राखण्यापर्यंत महिला पोलीस जबाबदारीने कर्तव्य बजावत आहेत. महिलांच्या संदर्भातील गुन्ह्यांची उकल करण्यात महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते. पुरुष कर्मचाऱ्यांइतकाच कामाचा ताण महिला पोलिसांवर देखील असतो, अशा स्थितीत अनेक महिला पोलीस कर्मचाऱ्यांची मुले पाच ते सात वर्षे वयोगटातील आहेत. आईने घरीच थांबावे, असा या चिमुकल्यांचा आग्रह राहत होता. आता त्या मुलांना त्यांची आई वेळ देऊ शकेल.
............................
आता आईसोबत रोजच खेळता येणार
आई पोलीस म्हणून काम करते. वडीलही आपल्या दुसऱ्या कामात व्यस्त असतात. आईला साप्ताहिक सुटी असेल त्याचदिवशी पूर्ण दिवस आई आम्हाला देते. इतर वेळी नेहमी धावपळ असल्याचे दिसून येते. शाळा बंद असल्यामुळे आम्हाला जास्तच आठवण येते; परंतु आता चार तास कामाचे कमी झाल्याने आई आम्हाला वेळ देईल.
- रितिका आशिष बहेकार
......
कोरोनाच्या काळात आईच्या कामाची वेळ वाढली आहे. त्यामुळे ती लवकर घरी यावी, असे नेहमी वाटते. आई ड्यूटीवर जाण्यापूर्वी सगळ्या गोष्टी सांगून जाते. आठवण आल्यानंतर फोन करून तिच्याशी बोलतो, कधी तरी ती घरी लवकर आल्यावर आम्हाला खूप आनंद होतो. आता आई दररोज आमच्या सोबत खेळणार आहे.
-एकांश बहेकार
............
आई पोलीस म्हणून काम करते. आईला साप्ताहिक सुटी असेल, त्याचदिवशी पूर्ण दिवस आई आम्हाला देते. लगेच पोलीस ठाण्यातून फोन आला की, हातातील काम बाजूला सारून धावत-पळत ती पोलीस ठाण्यात जाते. आता आईला कामाचे तास कमी झाल्याने आई आम्हाला सहज जास्त वेळ देईल.
- योगेश विजय फुंडे
...........
जिल्ह्यातील एकूण पोलीस ठाणे-१६
एकूण पोलीस-२२१०
महिला पोलीस-४५०