दररोज केशोरीत विजेचा लंपडाव सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:34 AM2021-09-04T04:34:55+5:302021-09-04T04:34:55+5:30
केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी व परिसरात मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. दिवसा एक-दोन वेळ वीज ...
केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी व परिसरात मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. दिवसा एक-दोन वेळ वीज खंडित होत असून रात्रीच्या वेळीसुद्धा वीज खंडित होणे सुरू झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याकडे विद्युत वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन केशोरीसह परिसरातील विद्युत पुरवठा नियमित सुरू ठेवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
केशोरी गावातील सार्वजनिक विद्युत पथदिवे गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहेत. त्याचबरोबर आता काही दिवसांपासून घरगुती वीजसुद्धा दररोज खंडित करण्याचा उपक्रम सुरू झाला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. रात्रीच्या वेळेस वीज खंडित झाल्याने डासांच्या त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागते. यामुळे डेंग्यू, मलेरियासारख्या साधीच्या आजारांची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे. पावसाळा असला तरीही उष्णतेचे प्रमाण कमी नाही. त्यामुळे सतत कुलर आणि पंखे सुरू ठेवावे लागतात. दररोज विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे विद्युत वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून केशोरीसह परिसरातील विजेचा होणारा लपंडाव थांबवून नियमित सुरळीत विद्युत पुरवठा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.