मोहीम यशस्वीतेसाठी सर्वांचा सहभाग आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 09:17 PM2018-11-19T21:17:12+5:302018-11-19T21:17:39+5:30
गोवर हा अत्यंत संक्रामक आणि घातक आजार आहे. गोवर आजाराचे निर्मुलन व रुबेला आजारावर नियंत्रण करण्यासाठी या मोहिमेची सुरुवात २७ नोव्हेंबरपासून होणार आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून समाजामध्ये या मोहिमेबाबत जागरु कता व सुरिक्षतता निर्माण करण्यासाठी या मोहिमेत पालकांनी, शिक्षकांनी व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोवर हा अत्यंत संक्रामक आणि घातक आजार आहे. गोवर आजाराचे निर्मुलन व रुबेला आजारावर नियंत्रण करण्यासाठी या मोहिमेची सुरुवात २७ नोव्हेंबरपासून होणार आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून समाजामध्ये या मोहिमेबाबत जागरु कता व सुरिक्षतता निर्माण करण्यासाठी या मोहिमेत पालकांनी, शिक्षकांनी व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.
गोवर रुबेला लसीकरण मोहिमेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या वेळी त्या बोलत होत्या. बैठकीला जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पी. बी. खंडाते, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.व्ही.पी.रुखमोडे उपस्थित होते.
बलकवडे म्हणाल्या, सर्वप्रकारच्या जिल्हास्तरीय व गाव पातळीवरील आढावा सभा आणि कार्यशाळा घेवून आपण आपली जबाबदारी समजून गोवर रुबेला लसीकरण मोहिमेबाबत जनजागृती करु न व्यापक प्रमाणात प्रचार-प्रसिध्दी करावी. समाजामध्ये या मोहिमेबाबत जागरु कता व सुरक्षीतता निर्माण करु न प्रत्येकाने आपल्या मुला-मुलींना दोन्ही रोग होण्यापासून वाचवावे. ही मोहिम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी जिल्हा आरोग्य प्रशासनाला सहकार्य करावे.
ज्यामुळे जिल्ह्यातील एकही बालक गोवर रुबेला लसीकरणापासून वंचित राहणार नाही.
डॉ. दयानिधी म्हणाले, गोवर रुबेला लसीकरण मोहिमेअंतर्गत ९ महिने ते १५ वर्षापर्यंत जवळपास ३ लाख ६० हजार ३५ लाभार्थ्याचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. निश्चित लाभार्थीपैकी जरी या अगोदर गोवर रुबेला लस दिली असेल तरी त्या बालकांना लसीकरण करावयाचे आहे. मोहिमेचा शुभारंभ २७ नोव्हेंबरला झाल्यानंतर ४ ते ५ आठवड्याचा कालावधीत मोहीम पूर्ण करण्यात येणार आहे.
निर्धारित करण्यात आलेल्या एकूण लाभार्थीपैकी ६० ते ६५ टक्के लाभार्थी हे शाळेत जाणारे विद्यार्थी असल्यामुळे आरोग्य विभागाच्या मदतीने सर्व शाळांमध्ये पहिल्या २ ते ३ आठवड्यात लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे.
त्यानंतर उर्वरित ३५ ते ४० टक्के लाभार्थीचे लसीकरण अंगणवाडी केंद्र व नियमीत लसीकरण सत्राच्या किंवा उपकेंद्राच्या ठिकाणी करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. बैठकीला विविध विभागांचे अधिकारी व स्वंयसेवी संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.
शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट
या लसीकरण मोहिमेअंतर्गत सर्व लाभार्थ्याला गोवर रु बेला लसीचे एक इंजेक्शन देण्यात येणार असून ग्रामीण व नागरी भागामध्ये १०० टक्के लाभार्थ्याना लसीकरण करणे आवश्यक आहे.
१७२० शाळांमध्ये लसीकरण
जिल्ह्यातील १ हजार ७२० शाळांमध्ये गोवर रुबेला लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी ४९८ लस टोचक तयार करण्यात आले. तसेच ९३० शाळाबाह्य विद्यार्थ्यांना ही लस देण्यात येणार आहे.