तंबाखूच्या दुष्परिणामांची प्रत्येकाला जाणीव व्हावी

By admin | Published: June 3, 2017 12:15 AM2017-06-03T00:15:23+5:302017-06-03T00:15:23+5:30

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे दरवर्षी जगात ५५ लक्ष तर भारतात १० लक्ष लोकांचा मृत्यू होतो.

Everyone should be aware of the consequences of tobacco | तंबाखूच्या दुष्परिणामांची प्रत्येकाला जाणीव व्हावी

तंबाखूच्या दुष्परिणामांची प्रत्येकाला जाणीव व्हावी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे दरवर्षी जगात ५५ लक्ष तर भारतात १० लक्ष लोकांचा मृत्यू होतो. या सेवनामुळे तोंडाचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग, रक्त कॅन्सर होण्यासोबतच उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा झटका येतो. सुखकर जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने व्यसनापासून दूर राहावे आणि प्रत्येकाला तंबाखूच्या दुष्परिणामाची जाणीव झाली पाहिजे, असे मत अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश मोहिते यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात गुरूवारी (दि.१) राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्र माअंतर्गत जिल्हास्तरीय समन्वय व सनियंत्रण समितीची सभा मोहिते यांच्या अध्यक्षते घेण्यात आली व या सभेत ते बोलत होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतिनिधी डॉ.फारुकी, शिक्षण विस्तार अधिकारी एम.एच.मोटघरे, विक्र ीकर विभागाचे रामप्रकाश विठोले, व्ही.आर.देवगडे, विस्तार अधिकारी आर.जी.गणवीर, प्रा.बबन मेश्राम, सहायक पोलीस निरिक्षक चंद्रशेखर चौरे, विस्तार अधिकारी आर.पी.बोदेले, लेखाधिकारी एल.एच.बावीस्कर, आकृती थिंक टूडे संस्थेचे हर्षल गुडधे, समुपदेशक सुरेखा मेश्राम, डॉ.पुजा शर्मा प्रामुख्याने उपस्थित होते.
मोहिते पुढे म्हणाले, आदिवासी भागातील मुले बालवयात पालकांचे तंबाखूचे व्यसन पाहून आहारी जातात. त्यामुळे ही भावी पिढी असलेली बालके तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या व्यसनपासून अलिप्त राहावी यासाठी त्यांचे आश्रमशाळा व वसतीगृहात समुपदेशन करावे. त्यांची मौखिक आरोग्य तपासणी करावी.गोंदियासह अन्य भागात सर्व यंत्रणांनी सामाजिक जाणीवेतून काम करावे. शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात अशा पदार्थाची विक्र ी होणार नाही याची दक्षता घ्यावी. धुम्रपान करण्याला व तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन सार्वजनिक ठिकाणी करण्यास बंदी असावी.

अधिकारी- कर्मचाऱ्यांची तपासणी करणार
जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांच्यापैकी कोण तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करतात याची तपासणी करणार असल्याचे सांगून मोहिते म्हणाले, सुरुवातीला संबंधिताला हे व्यसन सोडण्याचे आवाहन करण्यात येईल. त्यानंतर त्याने व्यसन सोडले नसल्यास याबाबत त्याच्या गोपनीय अहवालात त्याची नोंद घेण्याची कार्यवाही करण्यात येईल. आरोग्य विभागाने त्यासाठी प्रबोधनात्मक काम करावे. जास्तीत जास्त लोकांना व्यसनाचे दुष्परिणाम काय आहेत याची माहिती द्यावी असे त्यांनी सांगितले.

 

Web Title: Everyone should be aware of the consequences of tobacco

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.