प्रत्येकाला कायद्याची जाणीव असावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 10:05 PM2017-12-07T22:05:43+5:302017-12-07T22:05:57+5:30
कायद्यामध्ये अधिकार व कर्तव्ये दिली आहेत. ज्या व्यक्तींना त्यांचे अधिकार काय आहेत याबद्दल जाणीव नसेल तर तो व्यक्ती आपले जीवन योग्यरीत्या जगू शकत नाही.
आॅनलाईन लोकमत
गोंदिया : कायद्यामध्ये अधिकार व कर्तव्ये दिली आहेत. ज्या व्यक्तींना त्यांचे अधिकार काय आहेत याबद्दल जाणीव नसेल तर तो व्यक्ती आपले जीवन योग्यरीत्या जगू शकत नाही. माणसाने आपल्या कर्तव्याचे योग्यरीत्या पालन केले तर त्याच्या हातून कोणत्याही प्रकारचा गुन्हा घडणार नाही. यासाठी प्रत्येक व्यक्तीला कायद्याची जाणीव असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन नागपूरचे रेल्वे न्यायदंडाधिकारी एस.एन.फड यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रेल्वे विभाग व जिल्हा वकील संघाच्या संयुक्तवतीने नुकतेच पोलीस आणि नागरीक समन्वय, घरगुती हिंसाचार कायदा, रेल्वेशी संबंधीत कायदे व बालकांशी संबंधीत योजना या विषयांवर रेल्वे अधिकारी, कर्मचारी व कामगार वर्गाकरीता आयोजीत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. कार्यक्रमाला नागपूरचे मंडळ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश राऊत, प्रा. माधुरी नासरे प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी पांडे यांनी, रेल्वेत प्रवास करताना पुरुषांनी महिला आरक्षण डब्यामध्ये प्रवास करु नये. असे केल्यास कलम १६२ नुसार तो गुन्हा आहे.
दरवाज्याजवळील पायºयाजवळ उभे राहून प्रवास करणे, कोणतेही कारण नसताना गाडी थांबविण्यासाठी साखळी ओढणे व रेल्वेमध्ये प्रवास करताना विना परवाना सामानाची विक्री करणे हा देखील गुन्हा असल्याचे सांगितले. राऊत यांनी, पोलीस आणि जनता यांच्यात एकता असेल तर आपण चांगल्याप्रकारे काम करु शकतो. कायद्याची अंमलबजावणी करणे हे पोलिसांचे काम आहे. यावर न्यायालयाची नजर असते. दखलपात्र गुन्ह्यांमध्ये तपास करण्याचे अधिकार पोलिसांना असतात.
पुराव्याच्या आधारावर दोषारोपपत्र दाखल करता येते. एखादी व्यक्ती खोटी तक्र ार करीत असेल तर त्याच्यावर देखील गुन्हा नोंदविता येतो असे सांगितले.
प्रा. नासरे यांनी, बालकांची जबाबदारी पार पाडणे हे प्रत्येक पालकांचे कर्तव्य आहे. एखाद्या मुलाला वडील किंवा पालक नसेल तर त्याची काळजी आपण घेतली पाहिजे. एखादा मुलगा अनाथ असेल तर त्याच्याकरीता बाल शिशुगृहाची व्यवस्था आहे. अज्ञान मुला-मुलींकडून गुन्हा झाल्यास कमी वयात लग्न केल्यास पोसको कायद्यांतर्गत शिक्षा देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
संचालन व आभार एम. पी. चतुर्वेदी यांनी मानले. कार्यक्रमासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अधीक्षक आर. जी. बोरीकर, जी. सी. ठवकर, दिपाली थोरात, एल. पी. पारधी, पी.एन.गजभिये, ए.जे.नंदेश्वर, गुरु दयाल जैतवार, रविंद्रकुमार बडगे यांनी सहकार्य केले.