प्रत्येकाने उष्माघातापासून स्वत:चे संरक्षण करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 11:26 PM2018-04-24T23:26:21+5:302018-04-24T23:26:21+5:30
उन्हाळ्याच्या दिवसात बाहेर जाताना तीव्र तापमानामुळे उष्माघात होण्याची दाट शक्यता असते. उन्हामध्ये बाहेर जाताना प्रत्येकाने आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेवून उष्माघातापासून आपले संरक्षण करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : उन्हाळ्याच्या दिवसात बाहेर जाताना तीव्र तापमानामुळे उष्माघात होण्याची दाट शक्यता असते. उन्हामध्ये बाहेर जाताना प्रत्येकाने आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेवून उष्माघातापासून आपले संरक्षण करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर यांनी केले.
सोमवारी (दि.२३) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात उष्माघात व अग्नीसुरक्षा या विषयावरील कार्यशाळेत प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे, उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे, पोलीस उपअधीक्षक (गृह) दिपाली खन्ना, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, तहसीलदार रविंद्र चव्हाण, विठ्ठल परळीकर, सी.आर. भंडारी प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ. पातुरकर पुढे म्हणाले, उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता, दिवसेंदिवस तापमानात वाढ होत चालली आहे. जास्त तापमानामुळे तीव्र उन्हाचा मानवाच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असतो. अशावेळी उष्माघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
डॉ. निमगडे म्हणाले, जास्त तापमानामुळे उष्माघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे डॉक्टरांनी रु ग्णांची योग्य ती काळजी घेवून उष्माघात होणार नाही यासाठी प्रयत्न करावे, असे सांगितले.
खन्ना म्हणाल्या, पोलीस विभागातील विविध पथकांच्या माध्यमातून विविध घटनांमध्ये उल्लेखनीय कामगिगरी करण्यात आलेली आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी पोलीस विभाग सदैव सज्ज असल्याचे सांगितले.
कार्यशाळेत अदानी प्रकल्पाचे अग्नीशमन अधिकारी त्रिलोकिसंग पांचाळ यांनी आग प्रतिबंधक उपाययोजनांबाबत आपत्ती व्यवस्थापनात प्राथमिक उपाययोजना कशाप्रकारे कराव्यात, उपलब्ध साधनांच्या आधारे आपत्तीत जखमी झालेल्या व्यक्तीला पुढील उपचारासाठी नेण्याची उपाययोजना तसेच या काळातील प्रथमोपचार कशा पध्दतीने करता येईल, याबाबतची माहिती सादरीकरणातून उपस्थितांना दिली.
डॉ. हेमंत आळीकने यांनी उष्माघातापासून संरक्षण कसे करावे याबाबत सादरीकरणारे माहिती दिली. जसे श्रमिकांनी उन्हामध्ये जास्त श्रमाची कामे करणे टाळावे, उन्हात बाहेर निघताना डोळ्यांवर गॉगलचा वापर करावा. उन्हाळ्यात शक्यतो सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा आंघोळ करावी. जेणेकरु न तीव्र तापमानाच्या सुरक्षेच्या दृष्टीने उष्माघातापासून बचाव होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
एलपीजी गॅस वितरक अरविंद नागदेवे यांनी एलपीजी गॅस सिलेंडरचा तसेच शेगडी व रेग्युलेटरचा महिलांनी कशाप्रकारे योग्य वापर करावा, याबाबत माहिती दिली. तसेच महिलांनी गॅस शेगडी व रेग्युलेटरचा उपयोग काळजीपूर्वक करावे, असे सांगितले. सिलेंडर गॅसचे वजन १४.२ असते. सिलेंडर कधीही एक्सपायर होत नाही. गॅस शेगडी ही आयएसआय मार्कची असणे आवश्यक आहे. एलपीजी गॅस सिलेंडरचा विमा असतो. दुर्घटना झाल्यावर कंपनीमार्फत विमा देण्याची तरतूद आहे. गॅस सिलेंडर दुर्घटनेमुळे एखा्याचा मृत्यू झाल्यास योग्य ती पडताळणी करु न लाभार्थ्याला विमा कंपनीतर्फे ६ लाख रु पये विमा देण्यात येतो. गॅस शेगडीचा पाईप पाच वर्षांत एक्सपायर होत असतो. गॅस शेगडीचा वापर करताना रेग्यलेटरला नेहमी बंद करु न ठेवावे. जेव्हा काम असेल तेव्हाच रेग्युलेटर सुरु करावे अन्यथा बंद करु न ठेवावे, असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक व संचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले. आभार लेखाधिकारी लखीराम बाविस्कर यांनी मानले. कार्यशाळेला पोलीस निरीक्षक दिनेश शुक्ला, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. बबन मेश्राम, एच.एच. पारधी व अपूर्व मेठी तसेच महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी, आरोग्य विभाग, पोलीस विभाग व जिल्ह्यातील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्रसेनेचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.