मतदारांच्या उत्साहावर ईव्हीएमचे विरजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 10:42 PM2018-05-28T22:42:36+5:302018-05-28T22:43:12+5:30
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी (दि.२८) मतदान घेण्यात आले. ऐन मे महिन्यात निवडणूक होत असल्याने मतदार मतदान केंद्रापर्यंत जाणार की अशी शंका होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी (दि.२८) मतदान घेण्यात आले. ऐन मे महिन्यात निवडणूक होत असल्याने मतदार मतदान केंद्रापर्यंत जाणार की अशी शंका होती. मात्र जिल्ह्यातील जागृत मतदारांनी वाढत्या तापमानाचा विचार करीत सकाळी ७ वाजतापासूनच मतदान केंद्रावर गर्दी करायला सुरूवात केली. शेतकरी, शेतमजुर व कामगारांनी मतदान करुन कामाला जाण्याचे नियोजन केले होते. मात्र मतदान केंद्रावर पोहचल्यानंतर ईव्हीएम मशिन बंद असल्याने एक ते दीड तास प्रतीक्षा करावी लागली. त्यामुळे काही मतदार मतदान केंद्रावरुन परत गेले. तीव्र उन्हातही मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांच्या उत्साहावर ईव्हीएम आणि व्हीव्हीटीपॅट मशिन बंद पडल्याने विरजन पडल्याचे चित्र होते.
निवडणूक विभागाने लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र वगळता गोंदिया व तिरोडा मतदार संघासाठी मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ठेवली होती. दुपारी १२ वाजतानंतर उन्ह वाढत असल्याने शहरासह ग्रामीण भागातील मतदारांनी सकाळी ७ वाजतापासून मतदान केंद्रावर गर्दी केली होती. सकाळी ९ वाजतापर्यंत मतदान सुरळीत सुरू होते. त्यानंतर अर्जुनी मोरगाव, गोंदिया व तिरोडा या मतदार संघात ईव्हीएम व व्हीव्हीटीपॅट मशिन बंद असल्याच्या तक्रारी येण्यास सुरूवात झाली. ईव्हीएममुळे मतदान ठप्प झाल्याने सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व नेत्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे धाव घेत तक्रारी करण्यास सुरूवात केली. एकट्या गोंदिया विधानसभा क्षेत्रातून ईव्हीएम व व्हीव्हीटीपॅट मशिन बंद असल्याच्या १४५ तक्रारी तर अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात ६९ केंद्र आणि तिरोडा मतदार संघातून ४० वर तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामुळे ईव्हीएमवरुन जिल्हाभरात एकच गोंधळ उडाला. व्हॉटसअॅप व मोबाईलवर मॅसेज करुन मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशिन बंद असल्याची माहिती एकमेकांपर्यंत पोहचविली जात होती. उन्हाळ्याचे दिवस असल्याने मतदानाची टक्केवारी कमी होवू नये, यासाठी सर्वच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहचविण्याचे काम करीत होते. मात्र ईव्हीएममधील बिघाडाने त्यांच्या मेहनतीवर सुध्दा पाणी फेरल्या गेल्या. सकाळी ११ वाजतापर्यंत जिल्ह्यातील तीन्ही मतदारसंघात केवळ ८.५ टक्के मतदान झाले होत. तर दुपारी ३ वाजतापर्यंत केवळ २४.५७ टक्के मतदान झाले. त्यामुळे सायंकाळी ५ वाजतापर्यंत मतदानाची टक्केवारी ४० टक्केच्या वर जाते किंवा नाही याबाबत शंका व्यक्त केली जात होती. तर मतदान कमी होत असल्याने सर्वच राजकीय पक्षांसह उमेदवारांच्या चिंतेत सुध्दा भर घातली. सायंकाळी ५ वाजतापर्यंत तिरोडा मतदार संघात ३३.१८ टक्के, गोंदिया मतदार संघात ३२.७३ तर अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात ४४.५३ टक्के मतदान झाले.मात्र ही अंतीम टक्केवारी नसल्याचे निवडणूक अधिकाºयांनी सांगितले. या पोटनिवडणुकीसाठी ५० ते ५५ टक्के मतदान होण्याची शक्यता पूर्वीपासून वर्तविली जात होती.
या बूथवरील मतदान बंद
बूथ क्र.१६ जि.प.हिंदी प्राथमिक केंद्रीय शाळा काटी, बूथ क्र.३३ जि.प. हिंदी प्राथमिक केंद्रीय शाळा बनाथर, बूथ क्र.३५ जि.प. हिंदी माध्यमिक शाळा बघोली, बूथ क्र.३६ जि.प. हिंदी माध्यमिक बघोली,बूथ क्र.४३ जि.प. हिंदी प्राथमिक शाळा बिरसी, बूथ क्र.४४ जि.प. हिंदी प्राथमिक शाळा रायपूर, बूथ क्र.५० जि.प. प्राथमिक शाळा सोनपूरी,बूथ क्र.५२ जि.प. प्राथमिक शाळा लोहारा, बूथ क्र.९४ जि.प. उच्च प्राथमिक शाळा रतनारा,बूथ क्र.१०९ जि.प. मराठी प्राथमिक केंद्रीय शाळा अर्जुनी, बूथ क्र.११५ जि.प. मराठी उच्च केंद्रीय प्राथमिक शाळा कामठा, बूथ क्र.११६ जि.प. मराठी उच्च केंद्रीय प्राथमिक शाळा कामठा, बूथ क्र.११७ जि.प. मराठी उच्च केंद्रीय प्राथमिक शाळा कामठा, बूथ क्र.१२० जि.प. हिंदी प्राथमिक शाळा झिलमिली, बूथ क्र.१२३ जि.प.हिंदी माध्यमिक शाळा लंबाटोला-गिरोला, बूथ क्र.१२७ जि.प. हिंदी माध्यमिक शाळा पांजरा, बूथ क्र.१३५ जि.प. मराठी प्राथमिक शाळा कटंगीकला, बूथ क्र.१३८ जि.प. मराठी माध्यमिक मुले मुली शाळा कटंगीकला, बूथ क्र.१६९ बी.एच. जे. कॉलेज गोंदिया,बूथ क्र.१९४ मनोहर म्युनिसीपल हायर सेकेंडरी स्कूल गोंदिया, बूथ क्र.१९५ महावीर मारवाडी प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा गोंदिया, बूथ क्र.२०० एन. पी. मराठी प्राथमिक शाळा सिव्हील लाईन गोंदिया, बूथ क्र.२०६ जे. एम. हायस्कूल सिव्हील लाईन गोंदिया, बूथ क्र.२१५ श्री गुरूनानक प्राथमिक शाळा गोंदिया, बूथ क्र.२१८ बी. एन. आदर्श सिंधी विद्या मंदिर हायस्कूल गोंदिया, बुथ क्र.२२५ एन.पी. मराठी गणेशनगर गोंदिया, बुथ क्र.२३३ माताटोली म्युनिसिपल हायस्कूल गोंदिया, बूथ क्र.२४० एन.पी. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा गोंदिया, बूथ क्र.२५० एन.पी. मराठी हिंदी मालवीय शाळा गोंदिया,बूथ क्र.२५३ सरस्वती शिशू मंदिर मूर्री रोड गोंदिया, बूथ क्र.२७१ संत तुकाराम हायस्कूल कुडवा नाका गोंदिया, बूथ क्र.२७६ मनोहर म्युनिसीपल हायस्कूल इंग्लिश गोंदिया, बूथ क्र.२७६ (ए) अनाग्रीकर धम्मपाल सार्वजनिक वाचनालय गोविंदपूर गोंदिया, बूथ क्र.३०३ (ए) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलचूरपेठ गोंदिया येथील मतदान बंद आहे.
उमेदवारांचे भाग्य ईव्हीएमबद्ध
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांचे एकूण १८ उमेदवार रिंगणात होते. यासर्व उमेदवारांचे भाग्य ईव्हीएमबध्द झाले. त्यांच्या भाग्याचा फैसला ३१ मे ला होणार आहे. मात्र या निवडणुकीत खरी लढत ही राष्टÑवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे आणि भाजपचे हेमंत पटले यांच्यात होणार आहे. मतदानाची टक्केवारी कमी झाल्याने त्यांच्यात काटे की टक्कर होण्याची शक्यता आहे.
कमी टक्केवारीचा लाभ नेमका कुणाला?
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी ईव्हीएममधील बिघाडामुळे कमी प्रमाणात मतदान झाले. त्यामुळे कमी प्रमाणात झालेल्या मतदानाचा लाभ नेमका कुणाला होईल. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत जातीय समीकरण सुध्दा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने अंतीम समीकरण काय असणार याचे चित्र गुरूवारी (दि.३१) स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
त्या मतदान केंद्रांचे काय
ईव्हीएम मशिन बंद पडल्याने उपविभागीय अधिकाऱ्यांनी गोंदिया विधानसभा क्षेत्रातील ३८ मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया थांबविली. त्यामुळे या मतदान केंद्रावर केव्हा मतदान होणार हे अद्यापही स्पष्ट केले नाही. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.