निकृष्ट बांधकामाचे उत्कृष्ट उदाहरण
By admin | Published: January 17, 2015 01:51 AM2015-01-17T01:51:07+5:302015-01-17T01:51:07+5:30
जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या सडक अर्जुनी उपविभागीय कार्यालयाअंतर्गत कोहमारा ते कोलारगाव रस्त्याचे काम कंत्राटदारांमार्फत पूर्ण करण्यात आले.
सौंदड-रेल्वे: जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या सडक अर्जुनी उपविभागीय कार्यालयाअंतर्गत कोहमारा ते कोलारगाव रस्त्याचे काम कंत्राटदारांमार्फत पूर्ण करण्यात आले. या रस्त्याचे कारपेट सिलकोटचे काम झाले असून हे काम ८०० मिटरचे आहे. मात्र या कामात तांत्रिकदृष्ट्या तृट्या असल्याचे स्पष्टपणे दिसून येत असल्याने हे काम किती दर्जेदार होईल यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विशेष म्हणजे या गावातून जाणाऱ्या रस्त्याच्या कामाची कल्पना ग्रामपंचायतलाही नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
रस्त्याचे कारपेट व सिलकोटचे काम करण्यापूर्वी प्रथम बीबीएम व झालेल्या रस्याची ब्रशच्या सहायाने किंवा प्रेशर मशीनच्या सहायाने रस्त्यावरील धुळ स्वच्छ करावयास पाहिजे. परंतु हे काम करताना धूळ स्वच्छ करण्यात आली नाही. धूळ स्वच्छ केल्यानंतर झाऱ्याच्या सहाय्यााने रस्त्यावर डांबराचे टॅपकोट करावयाचे असते. परंतु कंत्राटदाराने तेही केले नाही. रस्ता धुळरहित झाल्यानंतर त्याच्यावर चुरी व डांबर एकत्रित करुन कोल्ड मिक्स कारपेट करण्यात आले नाही. या कोल्ड मिक्स कापरेटमध्ये ७५ टक्के रॉकेल तेल व २५ टक्के डांबर वापरुन कारपेटचे काम करण्यात आले.
कोल्ड मिक्स कारपेट झाल्यानंतर टॅपकोडचे काम करताना प्रथम झाऱ्याने रस्त्यावर डांबर मारावयास पाहिजे. परंतु कंत्राटदाराने असे न करता सरळ राखडमिश्रित डस्ट मारली आहे. वास्तविक येथे दाणेदार गिरीट वापरायला पाहिजे, परंतु या रस्त्याचे काम कोणत्याच तांत्रिक नियमानुसार केलेले नाही. त्यामुळे हे काम म्हणजे निकृष्टपणाचे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे बोलले जात आहे. संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या रस्त्याची तपासणी करुन शासकीय गुणवत्तेनुसार काम आहे की नाही याची खातरजमा करुन दोषी कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी सरपंच, उपसरपंच व गावकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)