खताच्या बॅगची जादा,दराने विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:23 AM2021-07-17T04:23:34+5:302021-07-17T04:23:34+5:30
लोहारा : शेतीसाठी महत्त्वाचा घटक असलेल्या रासायनिक खतांना आता चांगलीच मागणी वाढली असून त्याचा गैरफायदा घेत देवरी तालुक्यातील काही ...
लोहारा : शेतीसाठी महत्त्वाचा घटक असलेल्या रासायनिक खतांना आता चांगलीच मागणी वाढली असून त्याचा गैरफायदा घेत देवरी तालुक्यातील काही कृषी केंद्रावर वाढीव दराने रासायनिक खतांची विक्री केली जात आहेत. काही ठिकाणी तर सबसिडीच्या नावावर आधार लिंकिंग केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची लूट सुरूच असल्याचे चित्र आहे.
दरवर्षी साधारण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खरीप हंगामाची पेरणी सुरू होते. त्यादृष्टीने शेतकऱ्यांकडून बियाणे, खते, कीटकनाशके यांचे नियोजन केले जाते. यामध्ये मृग नक्षत्रात पेरणी झाल्यानंतर काही दिवसांनी खताची मात्रा द्यावी लागते. त्यात खताची टंचाई असल्याचा अनुभव शेतकऱ्यांना दरवर्षीच येतो. त्यामुळे खरीप हंगामापूर्वी खताचेही नियोजन आता केले जात आहे. त्यात केंद्र सरकारने खताच्या किंमती भरमसाठ वाढविल्याने शेतकरी चिंतीत झाला आहे. त्यानंतर केंद्र सरकारनेच खतांच्या अनुदानात वाढ केली. त्यामुळे रासायनिक खते पूर्वीच्याच किंमतीत विक्री करावे असे निर्देश देण्यात आले. याविषयी तालुक्यात पाहणी केली असता अनेक कृषी केंद्रांवर नव्या वाढीव दराने खतांची विक्री केली जात असल्याचे पहावयास मिळाले. याविषयी शेतकऱ्यांनी देखील जादा दराने खत घेतल्याचे सांगत आहे. एकीकडे सरकार व कृषी विभागाने खताच्या सुरळीत पुरवठ्यासाठी नियोजन केले असले तरी अनेक ठिकाणी खत शिल्लक नाही. २ बॅग इतर खत घ्या तरच एक बॅग युरिया खत देण्यात येणार असे सांगून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. काही दुकानदार तर खत नसल्याचे स्पष्ट सांगत असून यासोबतच सरकारने ठरवून दिलेल्या किंमतीपेक्षा ज्यादा दर घेतले जात असल्याचे दिसत आहे. तर तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्राना मुळ रकमेनुसारच खतविक्री करण्याच्या सक्त सूचना दिल्याचे तालुका कृषी अधिकारी जी.जी. तोडसाम यांनी सांगितले आहे.
---------------------------------
अशी सुरू आहे दिशाभूल
खत विक्री केंद्रावर १०:२६:२६ या खताची मागणी केली असता यासोबत ग्रॅनुअल घ्यावे लागेल. ते घेण्यास नकार दिला असता त्याशिवाय काहीच मिळणार नाही असे स्पष्टपणे सांगण्यात येते. ज्या खताची आवश्यकता असताना इतर खत घ्यावे लागत असल्याने त्यातून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. तर काही केंद्रात खताचा साठा संपला आहे असे सांगीतले जात आहे. डीएपी, १५:१५:१५ खत मिळावे यासाठी वाढीव रक्कम देण्यास तयार आहे, असे सांगितले मात्र तरी देखील खत उपलब्ध नसल्याचे सांगून परत पाठविले जात आहे. तर काही केंद्रांत ग्रुॅमरल २०:२०:०:१३ या खतासाठी १०५० रुपये तर डीएपीसाठी १४०० रुपये लागतील असे सांगतले जात आहे. मुळात त्यांची किंमत कमी असतानाही वाढीव रक्कम घेऊन शेतकऱ्यांची लूट सुरू आहे.
----------------------
कोट
तालुक्यातील कोणत्याही शेतकऱ्यांची लेखी तक्रार कार्यालयात आलेली नाही. शेतकऱ्यांनी लेखी तक्रार कार्यालयात केल्यानंतर आम्ही भरारी पथकाद्वारे कारवाई करुन संबंधित कृषी केंद्राचे परवाने रद्द करू.
जी.जी.तोडसाम
तालुका कृषी अधकारी, देवरी