डाक विभागाची कसरत : भारतीय संस्कृतीचे घडतेय दर्शन
By admin | Published: August 17, 2016 12:07 AM2016-08-17T00:07:40+5:302016-08-17T00:07:40+5:30
बहिण-भावाच्या पवित्र नात्यातील प्रेमाचे प्रतिक म्हणून रक्षाबंधन या सणाला आपल्या संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे.
गोंदिया : बहिण-भावाच्या पवित्र नात्यातील प्रेमाचे प्रतिक म्हणून रक्षाबंधन या सणाला आपल्या संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळेच चिमुकल्या मुलींपासून सर्व महिलांना सध्या रक्षबंधनाचे वेध लागले आहेत. अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या या सणासाठी आवडीची राखी खरेदी करण्यासाठी मंगळवारी गोंदियाच्या मार्केटमध्ये महिलावर्गाची एकच गर्दी दिसून आली.
अडचणीत किंवा संकटात भावाने बहिणीचे संरक्षण करण्याचे वचन म्हणून हा राखीचा धागा बांधला जात असला तरी केवळ एवढाच हेतू या रक्षाबंधनाचा नाही तर बहिण-भावाचे नाते आयुष्यभर एका प्रेमाच्या सूत्रात बांधले असावे, हा त्यामागील उद्देश्य असतो. पाश्चात्य संस्कृतीत रक्षाबंधनासारखे सण नाहीत. त्यामुळे तेथे बहिण-भावंडांमध्ये आपुलकी, आत्मियता, स्रेहभाव दिसून येत नाही. मात्र भारतीय संस्कृतीच्या वैशिष्ट्यांपैकी एक महत्वाचे वैशिष्ट म्हणजे रक्षाबंधन आहे. हा बंध केवळ धाग्याचा नसून बहिण-भावाच्या प्रेमाच्या नात्याचा असतो.
वर्षभरातून केवळ एकदाच नारळी पौर्णिमेच्या दिवशी येणाऱ्या या सणाची प्रत्येक भारतीय भाऊ-बहिण उत्सुकतेने वाट पाहत असतात. या दिवशी मी आपल्या भावाला त्याच्याजवळ नसलेली एखादी वस्तू भेट देईन व माझ्या बहिणीला आवडणारी एखादी वस्तू भेट देईन, अशी आशा ते बाळगून असतात. बहिण भावाच्या नात्यातील ही ओढ केवळ आपल्या भारतीय संस्कृतीतच आढळते.
त्यामुळेच महिलावर्गासोबत बहिणीला तिच्या आवडीचे गिफ्ट देण्यासाठी भाऊरायांचीही मार्केटमध्ये वर्दळ दिसून येत आहे.
शहरातील बाजारपेठ राख्यांच्या दुकानांनी सजली आहे. विविध प्रकारचे रंगीबिरंगी व रक्षासूत्र विक्रीसाठी उपलब्ध झालेली आहेत. आपल्या आवडीची रक्षासूत्रे पसंत करून महिला ती खरेदी करीत आहेत. पाच रूपयांपासून ते ५० रूपयांपर्यंत या रक्षासूत्रांचे दर असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे. शिवाय ५० रूपये डझन व १०० रूपये डझन याप्रमाणेसुद्धा राख्या विकल्या जात आहेत.
परगावी राहणाऱ्या भावांना राख्या पाठविण्यासाठी लिफाफ्यांची विक्रीसुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे. ग्रामीण भागात इतर सुविधा नसल्याने राख्या पोहोचविण्याच्या कामात डाकविभागाची मोठीच दमछाक होत आहे. डाक कार्यालयातही राख्यांनी भरलेल्या लिफाफ्यांची छाननी करण्यात डाक कर्मचारी व्यस्त असल्याचे चित्र दिसून येते. राखी विक्रीच्या दुकानांसह फळ व मिठाईच्या दुकानांवरही महिला व मुलींची गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत फळांचे दरसुद्धा आकाशाला भिडले आहेत. कपडे व दागिण्यांच्या दुकानांवरही भावंडांची गर्दी आढळून येत आहे. ते आपल्या बहिणीला कपडे किंवा दागिणे भेट देण्यासाठी विविध दुकानांमध्ये चकरा मारताना दिसून येत आहेत. विशेष म्हणजे आधुनिक काळात अनेक सण कालबाह्य होताना दिसतात. मात्र रक्षाबंधन या सणाचे महत्त्व दरवर्षी वाढतच जात असल्याचे दिसते.(प्रतिनिधी)