नवीन रूजू होईना, विद्यमान सीईओंना चार्ज सोडण्याचे आदेश मिळेना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:02 AM2021-09-02T05:02:48+5:302021-09-02T05:02:48+5:30
अंकुश गुंडावार गोंदिया : जिल्हा परिषदेचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप डांगे यांच्या बदलीचे आदेश २६ ऑगस्टला निघाले होते. ...
अंकुश गुंडावार
गोंदिया : जिल्हा परिषदेचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप डांगे यांच्या बदलीचे आदेश २६ ऑगस्टला निघाले होते. त्यांची जागी मुंबई येथील अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे संचालक अनिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, आठ दिवसांचा कालावधी लोटूनही पाटील यांनी पदभार स्वीकारला नाही तर विद्यमान मुख्य कार्यकारी डांगे यांना चार्ज सोडण्याचे आदेश आयुक्तांकडून अद्याप मिळाले नाही. त्यामुळे नवीन रूजू होईना आणि विद्यमान सीईओंना चार्ज सोडण्याचे आदेश मिळेना, असेच चित्र आहे.
कोरोनामुळे जिल्हा परिषदेची निवडणूक दीड वर्षांपासून लांबणीवर गेली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत प्रशासकराज सुरू आहे. त्यामुळे ‘हम करेसो कायदा’ याच धोरणाने जिल्हा परिषदेचा कारभार सुरू आहे. त्यातच विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी डांगे हे आपल्या मर्जीने कारभार करत असल्याचा आरोप जिल्ह्यातील चारही विद्यमान आमदारांनी केला. डांगे यांच्यावरील रोष जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदारांनी पालकमंत्री नवाब मलिक यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचत व्यक्त केला. त्यानंतरही काही झाले नाही म्हणून थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गाठून त्यांच्याकडे तक्रार केली तर दवनीवाडा येथील शाळा आवार भिंत बांधकामाला घेऊन आ. परिणय फुके, किसान आघाडीचे अध्यक्ष संजय टेंभरे यांनी याची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर आठ दिवसांत मुख्य कार्यकारी अधिकारी डांगे यांच्या बदलीचे आदेश धडकले. बदलीचे आदेश निघून आठ दिवस लोटले तरी नवीन सीईओ अनिल पाटील यांनी पदभार स्वीकारला नाही तर विभागीय आयुक्तांनी डांगे यांना चार्ज सोडण्याचे आदेश दिलेले नाही. त्यामुळे त्यांनी अद्याप चार्ज सोडला नसल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील चारही आमदारांनी एकीचे बळ दाखवत सीईओंच्या बदलीसाठी प्रयत्न केला. मात्र, डांगे यांनी अद्यापही चार्ज सोडला नसल्याने थोडी अस्वस्थता वाढली आहे.
.............
बंगल्यावरूनच कामकाज
मुख्य कार्यकारी अधिकारी डांगे यांच्या बदलीचे आदेश निघाल्यापासून त्यांनी जिल्हा परिषदेत पाय ठेवला नसल्याची माहिती आहे. ते बंगल्यावरच फाईल्स बोलावून स्वाक्षरी करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे जि.प.चे अधिकारी आणि कर्मचारी कामासंदर्भात त्यांच्या बंगल्यावरच जात असल्याची माहिती आहे.
...............
आमदारांचे वेट ॲन्ड वॉच
जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डांगे यांच्या विरोधात आमदारांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे तक्रार केली. पालकमंत्र्यांसमोरसुद्धा तक्रारींचा पाढा वाचला तर ग्रामसेवक आणि काही शिक्षक संघटनांनीसुद्धा रोष व्यक्त केला. त्यानंतर डांगे यांच्या बदलीचे आदेश निघाले. मात्र, त्यांनी अद्याप चार्ज सोडला नसल्याने आयुक्तांचे आदेश केव्हा धडकतात याची वाट पाहण्याची भूमिका आमदारांनी घेतल्याचे चित्र आहे.