प्रवासी वाढवा अभियान फसले
By admin | Published: February 6, 2017 12:40 AM2017-02-06T00:40:23+5:302017-02-06T00:40:23+5:30
एसटी तोट्यात असल्याने अधिक उत्पन्न वाढविता यावे यासाठी राज्य परिवहन मंडळांतर्गत येथील आगाराकडून प्रवासी वाढवा अभियान राबविले जात आहे.
बक्षिसांचे आमिषही ठरले फोल : पहिल्याच महिन्यात घटले प्रवासी
नरेश रहिले गोंदिया
एसटी तोट्यात असल्याने अधिक उत्पन्न वाढविता यावे यासाठी राज्य परिवहन मंडळांतर्गत येथील आगाराकडून प्रवासी वाढवा अभियान राबविले जात आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांचे हे अभियान असून यांतर्गत चालक व वाहकांना सुचना देवून त्यांच्यासाठी प्रोत्साहनपर बक्षीसेही ठेवण्यात आली आहेत. परंतु मागीलवर्षीच्या तुलनेत यावर्षी जानेवारी या पहिल्या महिन्यातच मोठ्या प्रमाणात प्रवाशांची संख्या कमी झाल्याने एसटीचे प्रवाशी वाढवा अभियान फसल्याचे दिसून येत आहे.
प्रवासी वाढवून उत्पन्न वाढविता यावे यासाठी परिवहन महामंडळाकडून जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात प्रवासी वाढवा मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या मोहीमेत ज्या ठिकाणी प्रवासी हात दाखवेल त्या ठिकाणी एसटी उभी करुन प्रवाशांना बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी चालक व वाहकांचे प्रशिक्षण घेवून त्यांना प्रत्येक फेरीत पाच प्रवासी वाढविण्याचे उद्दीष्ट देण्यात आले.
या उद्दिष्टाला साध्य करण्यासाठी दर दिवशी वाहक व चालकांनी उद्दिष्ट पूर्ति केल्याची माहिती गोंदिया आगाराला सोपवायची आहे. काही दिवस काही चालक -वाहकांनी टार्गेट पूर्ण केले. परंतु त्यानंतर अनेकांचे टार्गेट न झाल्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा प्रवाशांची संख्या वाढणे अपेक्षित होते. मात्र ही परिस्थिती उलट झाली आहे. जानेवारी महिन्यात २२ हजार ७४६ प्रवाशांचे उद्दिष्ट होते. परंतु ते पूर्ण होऊ शकले नाही. फेब्रुवारी महिन्यात २३ हजार ३३९ प्रवाशांचे उद्दिष्ट आहे. परंतु तेही पूर्ण होऊ शकणार नाही.
हात दाखवता एसटी न थांबविल्यास कारवाई
प्रवाशांनी रस्त्यावर एसटीला हात दाखवून थांबविण्याची विनंती केल्यावर एसटी न थांबविल्यास त्या चालक-वाहकांवर निलंबन किंवा बदलीसारखी कारवाई विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांकडून केली जाते. अनेक एसटी मोठ्या वाहनांच्या मागोमाग येत असल्यामुळे प्रवाशांना वेळीच हात दाखविता येत नाही. लग्नसराईसाठी कसल्याही फेऱ्या अद्याप वाढविण्यात आल्या नाहीत.
३२ चालक-वाहक कमी
गोंदिया आगारात ९० बस असून २०५ फेऱ्या जाने व २०५ फेऱ्या येणे अशा कराव्या लागतात. यासाठी १४३ चालक तर १३७ वाहक आहेत. गोंदिया आगाराला १९ वाहक तर १३ चालक कमी असल्याची माहिती मिळाली आहे. चालक व वाहकांच्या कमतरतेमुळे अनेकदा एसटीवर परिणाम पडतो.
पाच हजारांचे बक्षीस
प्रवाशी वाढवा अभियानात सलग तीन महिने उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या वाहकाला पाच हजारांचे बक्षीस देण्याची घोषणा आगाराने केली आहे. परंतु या अभियानादरम्यान चालक-वाहकांवर कसलेही गुन्हे दाखल होऊ नये, गुन्हे दाखल झाल्यास उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या चालक-वाहकांना गौरविण्यात येणार नाही असे ठरविण्यात आले.