उमेदवारांना २५ ते ५० हजार रुपयांच्या खर्चाची मर्यादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 05:00 AM2020-12-23T05:00:00+5:302020-12-23T05:00:22+5:30

ग्रामपंचायतला १४ वित्त आयोग आणि इतर योजनांमुळे मोठ्या प्रमाणात निधी मिळतो. तर जिल्हा परिषद सदस्य होण्यापेक्षा ग्रामपंचायतचा सरपंच होण्यासाठी अलीकडे स्पर्धा वाढली आहे. स्थानिक राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक ही महत्वपूर्ण आहे. त्यामुळे या निवडणुकीत राजकीय पक्षांसह इतर उमेदवारांनी सुध्दा रस घेतला आहे. 

Expenditure limit of Rs. 25,000 to 50,000 for candidates | उमेदवारांना २५ ते ५० हजार रुपयांच्या खर्चाची मर्यादा

उमेदवारांना २५ ते ५० हजार रुपयांच्या खर्चाची मर्यादा

googlenewsNext
ठळक मुद्देग्रा.पं.निवडणूक : निकालानंतर ३० दिवसात द्यावा लागणार खर्चाचा हिशोब

  लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतची निवडणूक १५ जानेवारी होवू घातली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीला सुध्दा अलीकडे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीप्रमाणे महत्व प्राप्त झाले आहे. उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. त्यामुळे निवडणूक आयोगाने ७ ते ९ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायच्या उमेदवारांना २५ हजार, ११ ते १३ सदस्य असलेल्या उमेदवारांना ३५ हजार आणि १५ ते १७ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतसाठी उमेदवारांना ५० हजार रुपयांपर्यंत खर्चाची मर्यादा घालून दिली आहे. 
ग्रामपंचायतला १४ वित्त आयोग आणि इतर योजनांमुळे मोठ्या प्रमाणात निधी मिळतो. तर जिल्हा परिषद सदस्य होण्यापेक्षा ग्रामपंचायतचा सरपंच होण्यासाठी अलीकडे स्पर्धा वाढली आहे. स्थानिक राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक ही महत्वपूर्ण आहे. त्यामुळे या निवडणुकीत राजकीय पक्षांसह इतर उमेदवारांनी सुध्दा रस घेतला आहे. 
ही निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवार खर्च करण्यास मागे पुढे पाहत नाही.  त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांचा बजेट आता लाखाच्यावर गेला आहे. त्यामुळे खर्चाला मर्यादा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने उमेदवारांना खर्चाची मर्यादा ठरवून दिली असून या मर्यादेत राहूनच खर्च करावा लागणार आहे. अन्यथा सदस्यांचे सदस्यत्व सुध्दा रद्द होवू शकते. निवडणुकी दरम्यान उमेदवारांनी केलेल्या खर्चाचा योग्य ताळमेळ कळावा यासाठी निवडणूक काळात स्वतंत्र बँक खाते उघडणे अनिवार्य केले आहे. तसेच निवडणुकीच्या निकालानंतर ३० दिवसांच्या आत या सर्व खर्चाचा हिशोब सादर करावा लागणार आहे. 
विशेष म्हणजे या सर्व प्रक्रियेवर निवडणूक विभागाची बारीक नजर असणार आहे. त्यामुळे उमेदवारांना मतदारांना खूश करण्यासाठी खर्च करताना या सर्व गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. 
आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात 
ग्रामपंचायतच्या निवडणूक प्रक्रियेला खऱ्या अर्थाने बुधवारपासून (दि.२३) सुरुवात होणार आहे. बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असून ३० डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी मागील आठ दिवसांपासून आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. 
असा आहे निवडणूक कार्यक्रम 
नामनिर्देशनपत्र दाखल करावयाची तारीख २३ ते ३० डिसेंबर सकाळी११  वाजता ते दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. ३१ डिसेंबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी,४ जानेवारी  अर्ज मागे घेण्याची तारीख, ४ जानेवारी दुपारी ३ वाजतानंतर चिन्ह वाटप व १५जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत मतदान व १८ जानेवारी रोजी  मतमोजनी असा निवडणूक कार्यक्रम आहे. निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे.

Web Title: Expenditure limit of Rs. 25,000 to 50,000 for candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.