गावात स्फोटांचे हादरे

By admin | Published: January 18, 2015 10:44 PM2015-01-18T22:44:45+5:302015-01-18T22:44:45+5:30

सतत ३० वर्षांपासून चिरचाळबांध पहाडीवर क्रशर मशिनद्वारे गिट्टी फोडण्याचे काम सुरू आहे. महिन्यातून एक किंवा दोन वेळा बॉम्बस्फोट करुन दगड काढले जातात. या स्फोटामुळे

Explosions in the village | गावात स्फोटांचे हादरे

गावात स्फोटांचे हादरे

Next

चिरचाळबांधवासीयांत दहशत : बारूदच्या दुर्गंधीमुळे गावकरी व पर्यावरणाला धोका
आमगाव : सतत ३० वर्षांपासून चिरचाळबांध पहाडीवर क्रशर मशिनद्वारे गिट्टी फोडण्याचे काम सुरू आहे. महिन्यातून एक किंवा दोन वेळा बॉम्बस्फोट करुन दगड काढले जातात. या स्फोटामुळे अर्ध्या कि.मी. अंतरावरील चिरचाळबांध गावाला हादरे बसत आहेत. या स्फोटांसाठी वापरण्यात येणाऱ्या बारुदच्या दुर्गंधीमुळे गावकरी व पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी आतापर्यंत कोणतीच दखल घेतली नाही.
या पहाडीवर क्रशर मशिनद्वारे गिट्टी फोडण्याचे काम सुरू आहे. दिवसातून अनेकवेळा लहान-सहान स्फोट करुन दगड बाहेर काढले जातात. मात्र मोठे दगड कठिण असल्यास त्यांच्यासाठी जास्त क्षमतेचे स्फोट केले जातात. या सततच्या स्फोटांमुळे चिरचाळबांध, शिवणी, भजेपार, सितेपार, बुराडीटोला, बासीपार या गावांना हादरा बसतो. यामुळे सिमेंट किंवा पक्क्या घरांनाही धोका निर्माण झाला आहे. क्रशर मशिनचे सहा सात ठिकाण असून तेथे बारीक गिट्टी तयार केली जाते. तर सुमारे १० ते १२ कंपन्या या पहाडीवर कार्यरत आहेत. पूर्ण चिरचाळबांध पहाडी ६० ते ७० एकरात विस्तारीत आहे. या पहाडीवरील गिट्टी अदानी पॉवर प्लांट, मध्यप्रदेश, गोंदिया व इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रकने तसेच ट्रॅक्टरने पाठविली जाते. अनेक व्यवसायी याठिकाणी प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष जुळले आहेत.
सदर पहाडीवरील गिट्टी खोदकाम करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांची अनुमती आवश्यक आहे. यात किती मशिनला गिट्टी फोडण्याची व बॉम्बस्फोट करण्याची परवानगी देण्यात आली ते गुलदस्त्यात आहे. सत्य काय याची कल्पना कुणालाच नाही.
मात्र येथील सततच्या स्फोटांमुळे परिसरात दहशत आहे. तर स्फोटांतून निघणाऱ्या बारुदच्या धुरामुळे खाणीत काम करणाऱ्या कामगारांसह परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
हा परिसर सतत बॉम्बस्फोट व निघणाऱ्या पांढऱ्या धुळाने वेढलेला असतो. केवळ पैसा कमविणे हाच मुख्य उद्देश या पहाडीवर दिसत आहे. याचा परिणाम भविष्यात परिसरातील गावांना व नागरिकांना निश्चित होईल. मुकबधिर जिल्हा प्रशासनाने याची दखल घेणे गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Explosions in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.