सोयगावटोली जंगलातून स्फोटक जप्त ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:56 AM2021-03-04T04:56:14+5:302021-03-04T04:56:14+5:30
गोंदिया : केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सोयगावटोली जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी पेरुन ठेवलेले विस्फोटके ३ मार्च रोजी पोलिसांनी जप्त केली. ...
गोंदिया : केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सोयगावटोली जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी पेरुन ठेवलेले विस्फोटके ३ मार्च रोजी पोलिसांनी जप्त केली. यात ९ जिवंत डेटोनेटर, ३ जिलेटीन कांड्या व रसायन मिश्रीत रेती आदींचा समावेश आहे.
पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार केशोरी पाेलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सोयगावटोली जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी घातपात करण्यासाठी स्फोटक साहित्य पेरुन ठेवले होते. माहिती मिळताच पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी जालींदर नालकुल यांच्या मार्गदर्शनात सी-६० देवरी येथील कमांडो पथक, पोलीस ठाणे केशोरी येथील अधिकारी, कर्मचारी, सशस्त्र दूरक्षेत्र भरनोली येथील अधिकारी व कर्मचारी व बी.डी.डी.एस. पथक यांनी सोयगावटोली जंगल परिसरात ३ मार्च रोजी सर्च ऑपरेशन राबवून जंगल परिसरात नाल्यामध्ये असलेला एक जर्मनचा संशयास्पद डब्बा शोधला. बी.डी.डी.एस. पथक व श्वानाच्या साहाय्याने खबरदारीच्या उपाययोजना करून पाहणी केली असता नक्षलवाद्यांनी घातपात घडवून आणण्यासाठी व पोलिसांना ठार मारण्याच्या उद्देशाने डब्यामध्ये स्फोटके साहित्य लपवून ठेवले होते. ते स्फोटक साहित्य बी.डी.डी.एस पथकाच्या मदतीने बाहेर काढले. त्यात ९ जिवंत डेटोनेटर, ३ जिलेटीन कांड्या व रसायन मिश्रीत रेती असे स्फोटक जप्त करण्यात आले. नक्षलवाद्यांच्या विरुद्ध केशोरी पोलिसांनी भारतीय स्फोटक पदार्थ कायदा कलम ४, ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जालींदर नालकुल करीत आहेत.