एक्स्प्रेस गाड्या रुळावर, मात्र पॅसेंजरची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 05:00 AM2021-06-28T05:00:00+5:302021-06-28T05:00:21+5:30
लोकल आणि पॅसेंजर गाड्या बंद असल्याने अद्यापही प्रवाशांना अतिरिक्त भाडे मोजून प्रवास करावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड बसत आहे. गोंदिया रेल्वे स्थानकावरून सध्या ४० गाड्या धावत आहेत. लॉकडाऊनपूर्वी नियमित ७५ हून अधिक गाड्या धावत होत्या. हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक हे महत्त्वपूर्ण स्थानक आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता, मागील दीड वर्षापासून अनेक रेल्वे गाड्या बंद आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्यानंतर रेल्वे विभागाने काही विशेष आणि एक्स्प्रेस गाड्या सुरू केल्या आहेत, पण मागील दीड वर्षांपासून पॅसेंजर आणि लोकल गाड्या अद्यापही रुळावर आलेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांची अडचण कायम आहे.
लोकल आणि पॅसेंजर गाड्या बंद असल्याने अद्यापही प्रवाशांना अतिरिक्त भाडे मोजून प्रवास करावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड बसत आहे. गोंदिया रेल्वे स्थानकावरून सध्या ४० गाड्या धावत आहेत. लॉकडाऊनपूर्वी नियमित ७५ हून अधिक गाड्या धावत होत्या.
हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक हे महत्त्वपूर्ण स्थानक आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता, मागील दीड वर्षापासून अनेक रेल्वे गाड्या बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना बसेस व इतर खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. रेल्वे विभागाने येत्या १ जुलैपासून काही रेल्वे गाड्या सुरू करण्याचे नियोजन केले होते. मात्र, आता कोरोनाच्या डेल्टा प्लसचा प्रादुर्भाव वाढल्याने पुन्हा नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यामुळे १ जुलैपासून नवीन रेल्वे गाड्या सुरू होण्याची शक्यता कमी आहे.
पॅसेंजर गाड्यांचे घोडे अडले कुठे?
- जिल्ह्यात मागील महिन्याभरापासून कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आहे. कोरोनाचा पाॅझिटिव्हिटी रेटही १ टक्केच्या आतच आहे. बसेसही पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत. मात्र, पॅसेंजर आणि लोकल गाड्या अद्यापही सुरू झालेल्या नाहीत.
- पॅसेंजर आणि लोकल गाड्या सुरू केल्यास गर्दी वाढून पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. n पॅसेंजर लोकल गाड्यांमध्ये मास्क, सॅनिटायझरचा वापर प्रवाशी करणार किंवा नाही याची शक्यता कमी आहे. n लसीकरणाचा टक्का ७५ टक्क्यांवर गेल्यानंतर बहुतेक रेल्वे गाड्या सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे.
प्रवासी काय म्हणतात?
कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून, नागरिकही आता स्वत:ची काळजी घेत आहेत. रेल्वे विभागाने एक्स्प्रेस गाड्या सुरू केल्या असून, पॅसेंजर गाड्या सुरू करण्याची गरज आहे. यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना मदत हाेऊन आर्थिक भुर्दंड बसणार नाही.
- दिलवर रामटेके,
रेल्वे प्रवासी
लोकल आणि पॅसेंजर गाड्या मागील दीड वर्षापासून बंद आहेत. त्यामुळे गोरगरीब प्रवाशांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. त्यामुळे रेल्वे विभागाने प्रवाशांची अडचण आणि त्यांना बसणारा आर्थिक भुर्दंड लक्षात घेता, पॅसेंजर आणि लोकल गाड्या सुरू करण्याची गरज आहे.
- प्रशांत मेश्राम,
रेल्वे प्रवासी