योजनांचा लाभ दारापर्यंत पोहोचवा
By admin | Published: March 2, 2017 12:13 AM2017-03-02T00:13:10+5:302017-03-02T00:13:10+5:30
केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोकोपयोगी योजना गावपातळीवरील सामान्य जनतेच्या कल्याणासाठी आहेत.
नाना पटोले : १२ कोटींच्या रस्ता बांधकामाचे भूमिपूजन
बोंडगावदेवी : केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोकोपयोगी योजना गावपातळीवरील सामान्य जनतेच्या कल्याणासाठी आहेत. आजही खऱ्या गरजू लाभार्थ्यांपर्यंत त्या योजना पोहोचत नसल्यामुळे गावातील सामान्य माणूस विकासापासून कोसो दूर आहे, अशी परिस्थिती निर्माण झालेली दिसत आहे. गावपातळीवरील सामान्य माणूस विकासाचा केंद्र बिंदू समजून विविध योजनांचा लाभ सामान्यांच्या दारापर्यंत सहजरित्या पोहोचविण्याचा आपला कटाक्ष राहणार. गावाच्या सर्वांगिण विकासासाठी परिसरातील रस्ते निटनेटके असणे गरजेचे आहे. रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही. गावातील सामान्य माणसाचा विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून दिल्लीच्या योजना गावात आणण्याची ग्वाही खा.नाना पटोले यांनी दिली.
केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत अड्याळ-दिघोरी-बोंडगावदेवी- नवेगावबांध-चिचगड या रस्त्यामधील नऊ किमी रस्त्याचे १२ कोटी रुपये खर्चून रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यात येत असलेल्या कामाचे भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
येथील मातोश्री रमाई आंबेडकर चौकातील दिघोरी-चान्ना मार्गावर विधीवत पूजाअर्चा करुन खा. नाना पटोले यांच्या हस्ते कुदळ मारुन भूमिपूजन करण्यात आले. भूमिपूजनानंतर स्थानिक बाजार चौकातील जि.प. प्राथमिक शाळेच्या पटांगणावर घेण्यात आलेल्या जाहीर सभेच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती अरविंद शिवणकर होते.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून खा. नाना पटोले होते. अतिथी म्हणून स्थानिक सरपंच राधेशाम झोळे, चान्नाचे सरपंच मोरेश्वर सोनवाने, बाक्टीचे सरपंच जितेंद्र शेंडे, सिलेझरीचे सरपंच प्रकाश टेंभुर्णे, जि.प. सदस्य कमल पाऊलझगडे, मंदा कुंभरे, माजी जि.प. अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे, उपसरपंच वैशाली मानकर, वनसमितीचे अध्यक्ष डॉ. श्यामकांत नेवारे, बाजार समितीचे उपसभापती लायकराम भेंडारकर, तंमुस अध्यक्ष तुळशीदास बोरकर, पं.स. उपसभापती आशा झिलपे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता लांजेवार, शाखा अभियंता कुमार जांभुळकर, वासनिक, शहारे, माजी पं.स. सदस्य अभय फुल्लुके, प्रमोद पाऊलझगडे, राजू पालीवाल, मुकेश जायस्वाल, चुन्नू नशिने, संजय जायस्वाल उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना खा. नाना पटोले म्हणाले, मागील काही वर्षापूर्वी ग्रामीण भागातील रस्त्यांची अत्यंत दयनिय अवस्था होती. आमदार असताना वैधानिक विकास महामंडळाच्या वतीने रस्त्यांची दुरुस्ती करुन गावाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला गेला. गावाची ओळख रस्त्यामुळे होत असल्याने संबंधित यंत्रनेने कामाचा दर्जा उत्तम ठेवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
पूर्वी परंपरेपासून चालत आलेली गरिबीची परंपरा मोडीत काढावी लागणार आहे. गावातील बेरोजगार युवकांना काम मिळण्यासाठी रोजगार उपलब्ध करण्यासाठी पुढे उपाययोजना निश्चित करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानिक अधिकार दिले आहेत. परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यास विलंब झाला. विद्यमान सरकार वंचितांना त्यांचे अधिकार व हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. बांधकाम विभागाने रस्त्यालगत तयार केलेल्या नाल्या खुल्या न ठेवता अंडरग्राऊंड कराव्या, असे निर्देशही त्यांनी संबंधितांना केले.
सामान्यांची तळमळ असल्याने लोकांच्या सामान्य तक्रारी निकाली काढण्यासाठी आपण जनता दरबाराच्या माध्यमातून एक उपक्रम राबवित असल्याचे खा. नाना पटोले यांनी सांगितले. संचालन रत्नाकर बोरकर तर प्रास्ताविक राधेशाम झोळे यांनी केले. आभार चान्नाचे सरपंच मोरेश्वर सोनवाने यांनी मानले. (वार्ताहर)
घरापासून कुणीही
वंचित राहणार नाही
केंद्र व राज्याच्या विविध योजना मानवी जीवनाच्या कल्याणासाठी आहेत. योजना समाजातील शेवटच्या घटकातील खऱ्या गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. येत्या २०२० पर्यंत प्रत्येक गरजूला घरे देण्याचा महत्वकांक्षी निर्णय प्रधानमंत्री मोदींनी घेतला आहे. त्यामुळे घरापासून कोणीही वंचित राहणार नाही. गावात होणारी ग्रामसभा विकासाचा प्राण आहे. गावातील जनतेने ग्रामसभेत सहभागी होवून विकास योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन खा. नाना पटोले यांनी याप्रसंगी केले.