विकास योजनांची माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 09:08 PM2018-04-22T21:08:47+5:302018-04-22T21:08:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : केंद्र व राज्य शासनाकडून ग्रामीण भाग व सर्वसामान्य नागरिकांच्या वैयक्तिक लाभासाठी शेकडो योजना राबविल्या जात आहेत. मात्र आजही ग्रामीण भागातील नागरिक मागासले आहेत. कारण त्यांच्यापर्यंत योजनांची माहिती पोहचत नाही. अशात पंचायत समिती व ग्रामपंचायतींनी योजनांची माहिती प्रत्येकापर्यंत पोहचवावी. तेव्हाच सर्व सामान्यांचा विकास होणार असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
पंचायत समितीची वार्षिक आमसभा नुकतीच पार पडली असून सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, पशुसंवर्धन-कृषी विभागाकडे पशुधन विकासासाठी पशुपालकांना गाय-बैल देण्याची योजना आहे. मात्र ज्या लाभार्थ्यांच्या नावावर लाखो रूपयांचे पशुधन वितरीत केले जाते त्यांना या योजनेबाबत काही माहिती नसते. तसेच त्यांच्याकडे पशु ही नसते. यामुळे सरकारच्या निधीचा गैरवापर थांबविण्यासाठी गंभीर प्रयत्न व्हायला हवे. अन्यथा कठोर कारवाईसाठी तयार रहावे असा इशाराही त्यांनी पंचायत समितीतील सर्व पदाधिकारी व अधिकाऱ्यांना दिला.
पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे यांनी, सर्व सामान्य नागरिकांच्या विश्वासावर खरे उतरण्यासाठी पंचायत समिती प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले. तर जिल्हा परिषद अध्यक्ष सिमा मडावी यांनी, आमदारांच्या नेतृत्वात तालुका विविध विकास कामे होत असून अशी दूरदृष्टी अन्य लोकप्रतिनिधीत बघावयास मिळत नसल्याचे सांगीतले. दरम्यान सभेत कृषी, पंचायत, शिक्षण, पशुसवंर्धन, बांधकाम, महिला सशक्तीकरण व बालविकास, वीज मंडळ, पोलीस, तहसील कार्यालय, अन्न व नागरी पुरवठा आदि विषयांवर तालुक्यात सुरू असलेली कामे तसेच नागरिकांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली.
सभेला जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले, सभापती लता दोनोडे, बाजार समिती सभापती चुन्नी बेंद्रे, उपसभापती धनलाल ठाकरे, चमन बिसेन, स्नेहा गौतम, प्रकाश रहमतकर, अर्जुन नागपुरे, रूद्रसेन खांडेकर, सरिता अंबुले, लक्ष्मी रहांगडाले, ओमप्रकाश भक्तवर्ती, मनिष मेश्राम, विजय लोणारे, विठोबा लिल्हारे, विमल नागपुरे, अनिल मते, विनिता टेंभरे, निता पटले, प्रमिला करचाल, प्रकाश डहाट, जयप्रकाश बिसेन, प्रिया मेश्राम, सारंग भेलावे, हरिचंद कावळे, इंद्रानी धावडे, योगराज उपराडे यांच्यासह तालुक्यातील सरपंच, उपससरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते.
पाणी टंचाईवरही चर्चा
आमसभेत आमदार अग्रवाल यांनी तालुक्यातील पाणी टंचाईचा विषय ही मांडला. त्यांनी पाणी टंचाईच्या समस्येशी निपटण्यासाठी योजनांवर गंभीर्याने विचार करणे आवश्यक असल्याचे सांगीतले. तसेच याबाबत विधानसभेच्या अर्थसंकल्पीय सत्रात याकडे सरकारचे ध्यानाकर्षित केले असून पाणी पुरवठा योजना लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश सरकारने जिल्हा प्रशासनाला दिल्याचे सांगीतले. तसेच शासनाच्या योजनांची माहिती सर्व नागरिक व सामाजीक कार्यकर्त्यांना व्हावी यासाठी जिल्हा परिषद क्षेत्रस्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यास सांगीतले.