धान खरेदीची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:22 AM2021-06-02T04:22:25+5:302021-06-02T04:22:25+5:30
गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, यामुळे कित्येक शेतकरी आपला सात-बारा ऑनलाईन करू शकले नाही. शिवाय ...
गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, यामुळे कित्येक शेतकरी आपला सात-बारा ऑनलाईन करू शकले नाही. शिवाय गावांमध्ये कंटेन्मेंट झोन असल्याने शेतकऱ्यांना कित्येक समस्यांचा सामना करावा लागला आहे. अशात धान खरेदीची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात यावी, अशी मागणी आमदार विनोद अग्रवाल यांनी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे फोनवरून केली आहे.
यंदा रब्बी हंगामात जिल्ह्यात अंदाजे ६५ हजार हेक्टर शेतीतून जवळपास ३५ लाख क्विंटल धानाचे उत्पन्न घेण्यात आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना आपला धान विक्री करण्यासाठी सातबारा ऑनलाईन करण्याची अंतिम तारीख ३१ मे होती. मात्र, कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने जनजीवन विस्कळीत झाले होते. ज्यामुळे अनेक शेतकरी आपला सातबारा ऑनलाईन करू शकले नाही. तसेच सतत लिंक फेल अथवा काही तांत्रिक कारण पुढे करून सातबारा ऑनलाईन करण्याच्या प्रक्रियेत खंड पडला होता. अनेक पटवारी देखील कोरोना पॉझिटिव्ह होते. सोबतच अनेक गावांमध्ये कंटेन्मेंट झोन असल्याने शेतकऱ्यांना समस्यांचा सामना करावा लागत होता. धान खरेदीची तारीख ३१ जुलै करण्याची विनंती केली. आमदार अग्रवाल यांनी त्वरित केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री दानवे यांना फोन लावून शेतकऱ्यांच्या मागण्या त्यांच्यापुढे मांडल्या आणि धान खरेदीची मुदत वाढवून देण्याची मागणी केली. यावर दानवे यांनी राज्य सरकारचा प्रस्ताव प्राप्त होताच तारीख वाढवून देऊ असे आश्वासन दिले, तर शेतकऱ्यांनी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावरच आपले धान विकावे असे आमदार अग्रवाल यांनी कळविले. भाऊराव उके, डॉ. कैलाश हरिणखेडे, जगदीश अग्रवाल, वजीर बिसेन, सुभान रहांगडाले, चैनलाल धामडे, सतीश रहांगडाले, शालिक हरिणखेडे, विश्वनाथ रहांगडाले, दिनेश अग्रवाल आणि डॉ. पटले उपस्थित होते.