रब्बी धान खरेदीची मुदत वाढवून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:20 AM2021-06-19T04:20:11+5:302021-06-19T04:20:11+5:30
केशोरी : आदिवासी विकास महामंडळाने विविध कार्यकारी संस्था, इळदामार्फत रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी शासकीय आधारभूत केंद्र सुरू झाले आहे. ...
केशोरी : आदिवासी विकास महामंडळाने विविध कार्यकारी संस्था, इळदामार्फत रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी शासकीय आधारभूत केंद्र सुरू झाले आहे. परंतु सदर शासकीय खरेदी केंद्र उशिरा सुरू झाल्यामुळे धान खरेदीसाठी ३० जूनपर्यंत दिलेली मुदत कमी पडत असून, किमान १ महिन्यापर्यंत धान खरेदीची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
अर्जुनी - मोरगाव तालुक्यातील ग्राम इळदा येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मंजुरी उशिरा मिळाली. हंगामातील धान खरेदी करण्याचा आधारभूत केंद्रांचा कालावधी १ मे ते ३० जून २०२१ हा आहे. परंतु प्रत्यक्षात आधारभूत धान खरेदी केंद्र ९ जूनपासून सुरू झाली आहेत. शेतकऱ्यांना फक्त २० दिवसांचा कालावधी धान विक्रीसाठी मिळत आहे. त्यात मृग नक्षत्र पहिल्या दिवसापासून बरसत असल्यामुळे शेतकरी खरीप हंगामातील शेतीच्या मशागतीच्या कामात गुंतलेले आहेत. सततच्या पावसामुळे काही दिवस धान खरेदी बंद करण्यात आली होती. त्यामुळे दिलेल्या निर्धारित कालावधीमध्ये शेतकऱ्यांजवळील धान खरेदी करणे शक्य होणार नाही. उन्हाळी धान खरेदी हंगामाला कमीत कमी १ महिन्याचा कालावधी अपेक्षित आहे. याकडे लक्ष देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांना ३० जुलैपर्यंत धान खरेदी करण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.