कोविडयोद्ध्यांसाठी असलेल्या सानुग्रह साहाय्य योजनेला मुदतवाढ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:31 AM2021-04-28T04:31:21+5:302021-04-28T04:31:21+5:30
गोंदिया : संपूर्ण राज्यात कोरोना महामारीने हाहाकार माजविला आहे. कोविड १९ विरुद्ध राज्य सरकारची लढाई सुरू आहे. कोविडयोद्धा म्हणून ...
गोंदिया : संपूर्ण राज्यात कोरोना महामारीने हाहाकार माजविला आहे. कोविड १९ विरुद्ध राज्य सरकारची लढाई सुरू आहे. कोविडयोद्धा म्हणून आरोग्य कर्मचारी, जिल्हा प्रशासन, महसूल विभाग, लेखा व कोषागारे, पोलीस, होमगार्ड, अंगणवाडीसेविका, अन्न व नागरी पुरवठा विभाग, पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषदेचे कर्मचारी, कर्तव्य बजावत आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लॉकडाऊन घोषित केले. दरम्यान, संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागली. या आपत्ती काळात सेवा देणाऱ्यांचा कोविडयोद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. शासनाने ५० लाख सानुग्रह सहाय्य सर्व कर्मचाऱ्यांना मंजूर करून डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ दिली होती. परंतु कोरोनाचा उद्रेक आता मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनाबाधित रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने शिक्षकांच्या सेवा कोविडविषयक कामांसाठी कोविड सेंटरवर सुविधा पुरविणे, रुग्ण ट्रेसिंग, लसीकरणाच्या कामात सहाय्य करणे व इतरही कोविड कर्तव्यांवर अधिग्रहित केल्या आहेत. कोविडविषयक कामे करताना संसर्गामुळे अनेक शिक्षक बाधित होत आहेत. कोविडविषयक कर्तव्य बजावतांना अनेक शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबाचा आधार हिरावलेला आहे, त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. त्यांच्या कुटुंबाना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ५० लाख सानुग्रह सहाय्य निधी त्यांच्या कुटुंबाला लवकर द्यावी व सानुग्रह सहाय्य निधी योजनेला डिसेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा गोंदियाच्या वतीने जिल्हाध्यक्ष संजय उके यांनी केली आहे. या संदर्भात निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांना पाठविण्यात आले आहे.