योजनांना जनतेपर्यंत पोहोचवा

By admin | Published: April 12, 2015 01:25 AM2015-04-12T01:25:06+5:302015-04-12T01:25:06+5:30

सामाजिक न्याय विभाग तसेच अन्य विभागाच्या अनेक लोककल्याणकारी योजना आहेत.

Extend the schemes to the masses | योजनांना जनतेपर्यंत पोहोचवा

योजनांना जनतेपर्यंत पोहोचवा

Next

गोंदिया : सामाजिक न्याय विभाग तसेच अन्य विभागाच्या अनेक लोककल्याणकारी योजना आहेत. लाभार्थ्यांना योजनांची माहिती मिळून त्या योजनांचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने तळागाळातील सामान्य जनतेपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी प्रसारमाध्यमांची भूमिका महत्वाची आहे. प्रसिध्दी शिवाय योजना यशस्वी ठरू शकत नाही, असे प्रतिपादन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.एस.एम.चव्हाण यांनी केले.
शुक्रवारी सामाजिक न्याय भवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित सामाजिक समता सप्ताहात प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी कार्यशाळा आयोजित केली होती. त्यावेळी उद्घाटक म्हणून डॉ. चव्हाण बोलत होते.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक नखाते, जि.प.चे कृषी अधिकारी व्ही.आर. निमजे उपस्थित होते.
चव्हाण पुढे म्हणाले, सामाजिक समता सप्ताहात सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करणारे विभाग तसेच या विभागांतर्गत असलेल्या महामंडळाच्या योजनांना प्रसारमाध्यमांनी व्यापक प्रसिध्दी द्यावी. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यास मदत होईल.
यावेळी त्यांनी पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. दुधाळ जनावराचे गट वाटप, शेळी गट वाटप, मोफत खाद्य वाटप, प्रशिक्षण योजना, नाविन्यपूर्ण योजना आदी योजनांचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
अध्यक्षस्थानावरून बोलतांना खडसे म्हणाले, सामाजिक न्याय विभाग तसेच या विभागांतर्गत असलेल्या महामंडळाच्या विविध योजनांची माहिती प्रसारमाध्यमांना व्हावी हा या कार्यशाळेमागचा उद्देश असून प्रसार माध्यमांच्या माध्यमातून ती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी. विविध जाती धर्मातील नागरिकांनी गुण्यागोविंदाने राहावे व सामाजिक समता वृध्दींगत करावी हा या सप्ताहाचा उद्देश आहे. नागरिकांनी आपल्या मूलभूत हक्काबाबत नेहमी जागृत असले पाहिजे. शासनाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रसारमाध्यम करीत असतात असेही ते म्हणाले.
माने यांनी बीज भांडवल कर्ज योजना, थेट कर्ज योजना, अनुदान योजना, मुदती कर्ज योजना, मार्जिन मनी कर्ज योजना, शैक्षणिक कर्ज योजना, सक्षम योजना, शिल्प संपदा योजना, स्वर्णिमा योजना, मायक्रो क्रेडीट योजना, महिला समृध्दी कर्ज योजना, कृषी संपदा, प्रशिक्षणाची माहिती दिली.
प्रास्ताविकातून समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त सुनील जाधव म्हणाले, सामाजिक न्याय विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. विशेष करून शिष्यवृत्ती योेजना, घरकुल योजना, कन्यादान योजना, आंतरजातीय विवाह योजना, मागेल त्याला प्रशिक्षण आदी योजनांची माहिती प्रसार माध्यमांनी तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावी असे आवाहन केले. महात्मा ज्योतीबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. संचालन बी.आर. चव्हाणे तर उपस्थितांचे आभार निलेश वाडेकर यांनी मानले. माध्यमांचे प्रतिनिधी, समाजकल्याण विभाग अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी लक्ष्मण खेडकर, अरूण पराते, राजेश खरोले, माणिक इरले, शैलेश उजवणे व योगेश हजारे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
विविध विभागाच्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
पोलीस उपविभागीय अधिकारी नखाते म्हणाले, १९८९ चा नागरी हक्क संरक्षण कायदा आहे. या कायद्याची जनतेमध्ये जनजागृती निर्माण करणे आवश्यक आहे. गृह विभागामार्फत मनोधैर्य योजना राबविण्यात येते. या योजनेमार्फत पिडीत महिलांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याचे काम पोलीस विभाग करीत असतो. शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकास करण्यासाठी सामाजिक न्याय विभाग प्रयत्नशील आहे असेही त्यांनी सांगितले.
कृषी अधिकारी निमजे यांनी, सामाजिक न्याय विभागाच्या विशेष घटक योजनेंतर्गत जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. दारिद्रय रेषेखालील कुटूंबाना आर्थिकदृष्ट्या मदत करून त्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम करणे. कृषी चर्चासत्र व कृषी प्रदर्शनीव्दारे जनतेमध्ये जनजागृती निर्माण करण्याचे काम या योजनेंतर्गत करण्यात येते असे सांगितले.
इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक जयदेव झोडापे यांनी त्यांच्या महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना, सुक्ष्म पतपुरवठा योजना, महिला समृध्दी योजना, स्वर्णिम योजना, मुदती कर्ज योजना, शैक्षणिक कर्ज योजना, मार्जिन मनी योजना तसेच अपंग वित्त विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.
संत रविदास चर्मोद्योग विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक भगत यांनी ५० टक्के अनुदान योजना, बीज भांडवल योेजना, प्रशिक्षण योजना, गटई स्टॉल योजना, महिला किसान योजना, महिला समृध्दी योजना, शैक्षणिक कर्ज आदी योजनांची माहिती दिली.

Web Title: Extend the schemes to the masses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.