ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विम्याची मुदत वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:28 AM2021-05-01T04:28:05+5:302021-05-01T04:28:05+5:30
गोंदिया: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. या रोगाचा प्रादुर्भाव आणि महामारी रोखण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने विविध योजना ...
गोंदिया: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. या रोगाचा प्रादुर्भाव आणि महामारी रोखण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येत आहे. ग्रामीण पातळीवर सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, ग्रामसेवक, संगणक परिचालक यांच्यामार्फत लोकांमध्ये जनजागृती, स्वच्छता मोहीम राबविणे, नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे इत्यादी कामे अहोरात्र मेहनत घेऊन जोखीम पत्करून कोरोनाची कामे केली जातात. त्या ग्रा.पं. कर्मचाऱ्यांंना असलेल्या विमा कवचाची मुदत वाढविण्याची मागणी ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने केली आहे.
भारत सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत, न्यू इंडिया इन्श्युरंश कंपनीच्या अपघात विमा योजने अंतर्गत राज्यातील ग्राम पंचायतीमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना ९० दिवसांसाठी ५० लाख रुपयांचा विमा उतरविण्याबाबतचा निर्णय ३१ मार्च २०२० रोजी आपल्या ग्रामविकास विभागाच्यावतीने शासन स्तरावर घेतला. या शासननिर्णयामध्ये वेळोवेळी सुधारणा करून मुदतवाढसुध्दा देण्यात आली होती. या शासननिर्णयामुळे मागील एक वर्षात कोराेनाच्या आजाराने मृत्यू झालेल्या राज्यातील काही कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाभ मिळाला आहे. ५० लाख कोरोना विमा कवच योजनेची मुदत २४ मार्च २०२१ ही होती. या कालावधीतील प्रस्तावाची अंतिम मुदत २४ एप्रिल २०२१ ही होती तीसुध्दा संपलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे यांच्या २८ एप्रिलच्या पत्रानुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य सेवेत काम करणाऱ्या विविध कर्मचाऱ्यांच्या यापूर्वीच्या विमा कवच योजनेची मुदत २४ मार्च २०२१ नंतर पुढील १८० दिवसांसाठी मुदत वाढ देण्यात आली आहे. राज्यातील ग्रामपंचायत स्तरावर काम करणारे ग्रा.पं. कर्मचारी जीवाची पर्वा न करता महामारीच्या काळात गेल्या एक वर्षापासून अहोरात्र मेहनत करीत आहे. यांनाही २४ मार्च २०२१ नंतर कोरोना आजाराने जर कर्मचाऱ्याचा अचानकपणे मृत्यू झाल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना विमा योजनेचा लाभ देण्यासाठी विमा कवच योजनेची मुदत वाढवून देण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे राज्य संघटक मिलिंद गणवीर, राज्य सचिव नीलकंठ ढोके यांनी केली आहे.