कारच्या धडकेत गोरेगाव पं.स.चे विस्तारी अधिकारी ठार; गोंदिया-बालाघाट मार्गावरील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2022 11:18 AM2022-12-02T11:18:00+5:302022-12-02T11:34:23+5:30
टिप्परला ओव्हरटेक करताना कारचा अपघात, जिल्हा परिषदेसमोरील घटना
गोंदिया : टिप्परला ओव्हरटेक करताना कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने पादचाऱ्याला दिलेल्या धडकेत गोरेगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ठार झाल्याची घटना गुरुवारी (दि.१) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गोंदिया-बालाघाट बायपास मार्गावरील जिल्हा परिषदेसमोर घडली. शशिकांत खोब्रागडे, रा. शिवनगर, सैनिक चौक, फुलचूर, गोंदिया, असे मृतक विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे, तर कार चालक जखमी झाला.
शशिकांत खोब्रागडे हे गोरेगाव पंचायत समिती शिक्षण विभागात विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते रा. शिवनगर, सैनिक चौक, फुलचूर, गोंदिया येथे राहतात. दररोज सायंकाळच्या सुमारास ते गोंदिया-बालाघाट मार्गावर पायी फिरायला जात हाेते. गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ते या मार्गावर फिरायला जात असताना कारने (एमएच ३५, एआर १३५०) एका टिप्परला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, कार चालकाचे नियंत्रण सुटून त्याने पायी जात असलेले शशिकांत खोब्रागडे यांना जोरदार धडक दिली. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर कारचा वेग अधिक असल्याने ती रस्त्याच्या कडेला चार वेळा पलटी झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. दरम्यान, कार चालकसुद्धा गंभीर जखमी असून, त्याला १०८ रुग्णवाहिकेने मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. गोंदिया- बालाघाट बायपास मार्गावर सातत्याने वाहनांची वर्दळ असते. त्यातच हा अपघात ज्याठिकाणी घडला तो अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेसमोरच हा अपघात घडल्याने जवळ उपस्थित असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्याला सुरुवात केली. या घटनेची नोंद गोंदिया ग्रामीण पोलिसांनी घेतली आहे.
ओव्हरटेक करण्याच्या नादात घडला अपघात
प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार गोंदिया-बालाघाट मार्गावरील अपघात हा कारने टिप्परला ओव्हरटेक करण्याच्या नादात घडल्याचे बोलले जाते. कारचा वेग अधिक असल्याने ती रस्त्याच्या कडेला चारदा पलटी झाली.
खोब्रागडेंचा गेला नाहकच बळी
विस्तार अधिकारी पदावर कार्यरत असलेले शशिकांत खोब्रागडेंना दरराेज सायंकाळी फिरायला जायची सवय होती. ते नियमित गोंदिया- बालाघाट मार्गावर फिरायला जायचे. गुरुवारीसुद्धा ते त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे फिरायला जात होते. भरधाव कारने त्यांना धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने खोब्रागडे कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे.