अवांतर वाचनामुळे विद्यार्थ्यांच्या बौध्दिक पातळीत भर- चौधरी
By admin | Published: September 15, 2016 12:35 AM2016-09-15T00:35:37+5:302016-09-15T00:35:37+5:30
जिल्हा परिषदेच्या वतीने विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वागिण विकास साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आमगाव : जिल्हा परिषदेच्या वतीने विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वागिण विकास साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाव्यतिरीक्त अवांतर पुस्तके वाचण्याचा छंद निर्माण व्हावा म्हणून वाचन-आनंद दिवस साजरा करण्यात आला. या अवांतर वाचनामुळे विद्यार्थ्यांच्या बौध्दिक पातळीत भर पडल्याचे जाणवले, असे उद्गार देवरी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्पाधिकारी जितेंद्र चौधरी यांनी व्यक्त केले.
पं.स.आमगावअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक डिजीटल शाळा बिरसी येथे दिलेल्या भेटीदरम्यान ते बोलत होते. बिरसी येथील शाळेत वर्ग पहिली व दुसरीचे विद्यार्थी चित्ररुपी पुस्तके प्रोजेक्टरच्या माध्यमातून शिक्षण घेत असल्याचे पाहून फार आनंद झाला. त्यांनी या चिमुकल्या बालकांसोबत बसून हितगुज केले. पाढे, कविता व चित्ररुपी पुस्तकांचे वाचन घेतले. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहून त्यांचे चौधरी यांनी तोंडभरून कौतुक केले. वर्ग तिसरी ते पाचवीच्या मुलांना कथा, गोष्टी, इसापनिती वाचण्यास सांगितले. त्यालाही विद्यार्थ्यांने चांगला प्रतिसाद दिला.
बिरसी शाळेच्या उपक्रमांची व स्नेहसंमेलनाची क्लीप प्रोजेक्टरवर बघून शाळेत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची अधिकाऱ्यांनी प्रशंसा केली. मुख्याध्यापक एल.यू.खोब्रागडे यांच्यासह सर्व शिक्षकांचे व ग्रामवासीयांचे त्यांनी कौतुक केले. या अनुषंगाने शालेय पोषण आहार, आंगणवाडी व शालेय परिसराची पाहणी केली. परिसर अतिशय सुंदर असल्याचा शेरा नमूद केला. जि.प.शाळेत शिकूनच मी या पदावर कशाप्रकारे पोहोचलो हे सांगून आपणसुध्दा निरंतर अभ्यास केला तर माझ्यापेक्षाही मोठ्या पदावर पोहचू शकता, अशी प्रेरणा दिली.
या भेटीदरम्यान केंद्र प्रमुख डी.एल.गुप्ता, विषयतज्ज्ञ वशिष्ट खोब्रागडे, शा.व्य.स.अध्यक्ष राजकुमारी चौधरी, सदस्ता ममता पटले, वच्छला उईके, एल.यू.खोब्रागडे, उपक्रमशिल शिक्षीका वर्षा बावनथडे, तंत्रस्नेही शिक्षक विकास लंजे व पालक वर्ग उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)