नैराश्यापोटी टोकाचे पाऊल, एकाच दिवशी चार जणांचा आत्महत्येचा प्रयत्न!
By नरेश रहिले | Published: December 23, 2023 10:06 PM2023-12-23T22:06:07+5:302023-12-23T22:07:19+5:30
आत्महत्या हा पर्याय नाही, संवादातून निघू शकतो मार्ग...
गोंदिया : मनात आलेल्या नैराश्यापोटी विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविण्याचा विचार आल्याने २२ डिसेंबर रोजी एकाच दिवशी गोंदिया जिल्ह्यातील चौघांनी विष प्राशन केल्याने त्यांना उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
सालेकसा येथील चांगुला राजकुमार राऊत (वय ५५) हिने अनोळखी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला २२ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. दुसरी घटना गोंदिया शहराच्या ईसरका मार्केटच्या येवले चायजवळ घडली. अर्जुन तुलसीदास छुरा (४०, रा. यादव चौक, गोंदिया) याने उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला सायंकाळी ५:१० वाजता उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तिसरी घटना सालेकसा तालुक्याच्या भाडीपार येथील आहे. भाडीपार येथील १७ वर्षांच्या मुलीने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. तिला दुपारी १२ वाजता उपचारासाठी दाखल करण्यात आले.
चौथी घटना सडक-अर्जुनी तालुक्याच्या खडकी येथील आहे. तुलाराम रामलाल सलामे (३५) याने स्वत:च्या घरीच उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याचा प्रथमोपचार सडक-अर्जुनीच्या ग्रामीण रुग्णालयात केल्यानंतर पुढील उपचारासाठी सायंकाळी सात वाजता गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्या चौघांवर उपचार सुरू असून या घटनेची नोंद गोंदिया शहर पोलिसांनी केली आहे.
तरुणांनो, टोकाचे निर्णय घेऊ नका
कुठल्याही समस्या अथवा अडचणीवर संवादातून मार्ग काढता येतो. त्यासाठी थेट आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेणे चुकीचे आहे. नैराश्य हे काही वेळेपुरते असते. आपले कुटुंब व मित्र परिवाराशी संवाद साधा, त्यांच्याजवळ व्यक्त व्हा; नक्कीच यातून मार्ग निघेल. नैराश्यातून बाहेर पडता येईल.
- डॉ. लोकेश चिरवतकर, मानसिक रोग तज्ज्ञ