१४ लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल नक्षलवाद्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:33 AM2021-03-09T04:33:00+5:302021-03-09T04:33:00+5:30

गोंदिया : मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील मालकुआ जंगलात पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीदरम्यान पोलिसांना एका जहाल नक्षलवाद्यास पकडण्यात ...

Extremist Naxalite arrested with Rs 14 lakh bounty | १४ लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल नक्षलवाद्यास अटक

१४ लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल नक्षलवाद्यास अटक

Next

गोंदिया : मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील मालकुआ जंगलात पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीदरम्यान पोलिसांना एका जहाल नक्षलवाद्यास पकडण्यात यश आले. ही कारवाई सोमवारी (दि. ८ मार्च) करण्यात आली.

मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील लांजी क्षेत्रातील मालकुआ जंगलात १५ ते २० नक्षलवादी असल्याची गुप्त माहिती बालाघाट पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच बालाघाट पोलिसांनी हॉकफोर्सच्या जवानांसह या जंगलात सर्च ऑपरेशन केले. सोमवारी सकाळी ६ ते ७ वाजताच्या दरम्यान मालकुआ जंगलात पोलिसांना १५ ते २० नक्षलवादी आढळले. पोलिसांनी त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले. मात्र, त्यांनी पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करत जंगलात पळण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान हॉकफोर्सच्या जवानांनी गोळीबार केला. पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जवळपास ४५ मिनिटे फायरिंग सुरू होती. दरम्यान, नक्षलवाद्यांनी टिकाव लागत नसल्याचे पाहून जंगलात पळ काढला. त्यात एका जहाल नक्षलवाद्याला पकडण्यात पोलिसांना यश आले. श्यामलाल ऊर्फ मोतीराम सनकु जांग धुर्वे असे त्या जहाल नक्षलवाद्याचे नाव असून, तो हार्डकोर समितीचा सदस्य आहे. त्याच्यावर १४ लाख रुपयांचे बक्षीस असल्याची माहिती पुढे आली. ताे गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्या अंतर्गत येणाऱ्या मुरमगाव कटेझरी येथील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे.

.......

श्यामलालवर ८४ गुन्हे दाखल

टांडा परिसरात कमेटी सदस्य असलेल्या जहाल नक्षलवादी श्यामलाल ऊर्फ मोतीराम सनकु जांग धुर्वे याच्यावर मध्यप्रदेशात १५, छत्तीसगडमध्ये ८, महाराष्ट्रात ६१ गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील पोलीस अनेक वर्षांपासून त्याच्या मागावर होते. श्यामलालवर बालाघाट जिल्ह्यात २०१० पोलिसाची हत्या, २०१९ मध्ये पेंद्र नामक व्यक्तीची हत्या असे अनेक गुन्हे दाखल होते.

त्याच्या अटकेसाठी मध्य प्रदेश पोलिसांनी ३ लाख, छत्तीसगड पोलिसांनी ५ लाख आणि महाराष्ट्र पोलिसांनी ६ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. दरम्यान, त्याला जेरबंद करण्यात अखेर बालाघाट पोलिसांना यश आले.

.....

मालकुआ येथील कंत्राटदारांची वाहने जाळण्यात होता सहभागी

३० जानेवारी २०२१ रोजी लांजी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या देवरबोली चौकी अंतर्गत येणाऱ्या प्रधानमंत्री ग्रामसडक विकास प्राधिकरणाच्या देखरेखीत आरसीपीएलडब्लूई योजनेंतर्गत देवरबेली ते मालकुआदरम्यान बनविल्या जात असलेल्या रस्त्याच्या कामावर ३ वाहनांना लावलेल्या आगीच्या घटनेत दलमसोबत अटकेत असलेल्या नक्षलींमध्ये श्यामलालसुद्धा होता. माहितीनुसार, अद्याप देवरबेली क्षेत्रात मालकुआ व चिलकोना जंगलातील विकासकामांवर असलेल्या मशीन्स जाळण्यासाठी व पोलीस पार्टीवर हल्ला करून दहशत माजविण्याच्या तयारीत नक्षली होते. मात्र नक्षली यामध्ये यशस्वी होण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना हाकलून लावल्याची माहिती पोलीस महासंचालक के.पी. व्यंकटेशवराव, बालघाटचे पोलीस अधीक्षक अभिषेक तिवारी यांनी दिली.

......

Web Title: Extremist Naxalite arrested with Rs 14 lakh bounty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.