नेत्रदानाप्रती नागरिक होताहेत डोळस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 12:28 AM2018-09-09T00:28:12+5:302018-09-09T00:28:55+5:30
नेत्रदान हे श्रेष्ठ दान आहे, मृत्युनंतर मनुष्याचे शरीर नषवर होते. मात्र मृत्युनंतर ६ तासांनी नेत्रदान करता येते. यामुळे मृत्युनंतर एखाद्याच्या जीवनातील अंधकार दूर करता येणे शक्य आहे. हळूहळू ही बाब आता शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना सुध्दा कळू लागली आहे.
अंकुश गुंडावार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नेत्रदान हे श्रेष्ठ दान आहे, मृत्युनंतर मनुष्याचे शरीर नषवर होते. मात्र मृत्युनंतर ६ तासांनी नेत्रदान करता येते. यामुळे मृत्युनंतर एखाद्याच्या जीवनातील अंधकार दूर करता येणे शक्य आहे. हळूहळू ही बाब आता शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना सुध्दा कळू लागली आहे. नागरिक नेत्रदानाप्रती डोळस होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मागील दोन महिन्यात जिल्ह्यातील चारशे नागरिकांनी नेत्रदान करण्याचे प्रतिज्ञपत्र भरले आहे. तर तिघांनी मृत्युनंतर नेत्रदान करुन समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
देशात नेत्रहिनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. काहींचे डोळे आजारामुळे तर काहींचे अपघातमुळे निकामी झाले. त्यामुळे त्यांना जगातील सौंदर्य पाहण्यापासून मुकावे लागले.
यामुळे त्यांच्या जीवनात अंधकार निर्माण झाला आहे. मात्र विज्ञान आणि तंत्रज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे अंध व्यक्तींना पुन्हा डोळस करणे शक्य असून त्यांना जगातील सौंदर्य न्याहाळता येणे शक्य आहे. कोणत्याही व्यक्तीचा मृत्यु झाल्यानंतर ते नेत्रदान करू शकतात. मृत्युनंतर ६ तासांच्या कालावधीत नेत्र बुबुळ काढावे लागते.
नेत्रदानाच्या माध्यमातून नेत्रबुबुळाच्या आजाराने पिढीत रुग्णांना दृष्टी देता येते. गंभीर आजाराचे रुग्ण वगळता सर्वांनाच नेत्रदान करता येते. शिवाय आपण केलेल्या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तीच्या जीवनात प्रकाश निर्माण करता येतो. या सर्व गोष्टींची जाणीव आता जिल्हावासीयांना होवू लागली आहे. त्यामुळे मागील दोन महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील ४०० नागरिकांनी मृत्युपश्चात नेत्रदान करण्याचे प्रतिज्ञापत्र येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नेत्र रुग्ण विभागाकडे भरुन दिले आहे. विशेष म्हणजे गोंदिया येथे महिनाभरापूर्वी आयोजित सिंधी समाजबांधवाच्या एका कार्यक्रमात तब्बल दीडशे नागरिकांनी नेत्रदान करण्याचा संकल्प करुन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. तर दोन दिवसांपूर्वी गोंदिया विधानसभा व्हॉट्सअॅप ग्रुपच्या कार्यक्रमात सुध्दा अनेकांनी नेत्रदान करण्याचे प्रतिज्ञा पत्र भरुन देत नेत्रदानाचा संकल्प केला. यामुळे नेत्रदानाप्रती नागरिक डोळस होत असल्याचे दिलासा दायक चित्र आहे.
नेत्रदानासाठी काय करावे लागते?
गंभीर आजाराचा रुग्ण वगळता कुणीही नेत्रदान करु शकतो. नेत्रदान करण्यासाठी संमतीपत्र भरण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर नेत्रदान कर्त्यांची नोंदणी करुन त्यांना डोनर शासकीय रुग्णालयातून डोनर कार्ड दिले जाते. नेत्रदान कर्त्याच्या मृत्त्युनंतर लगेच त्याच्या नातेवाईकांनी याची माहिती जवळच्या शासकीय रुग्णालयाला देणे आवश्यक आहे. मृत्युच्या आधी नेत्रदान संकल्प पत्र भरले नसल्यास मृत व्यक्तीचे नातेवाईक वेळवर नेत्रदानाचा निर्णय घेवून मृत व्यक्तीचे नेत्रदान करू शकतात.