फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 12:35 AM2018-04-04T00:35:15+5:302018-04-04T00:35:15+5:30
गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार गोपालदास अग्रवाल व त्यांच्या कुटुंबीयासंदर्भात बदनामीकारक मजकूर फेसबुकवर टाकणाऱ्या व त्यावर कांमेन्टस करणाऱ्या दोघांवर शहर पोलिसांनी सोमवारी (दि.२) गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार गोपालदास अग्रवाल व त्यांच्या कुटुंबीयासंदर्भात बदनामीकारक मजकूर फेसबुकवर टाकणाऱ्या व त्यावर कांमेन्टस करणाऱ्या दोघांवर शहर पोलिसांनी सोमवारी (दि.२) गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी सम्मी विरेंद्रकुमार जायस्वाल फुलचूर नाका रोड गोंदिया व नगर परिषदेचे उपाध्यक्ष शिवकुमार शंकरलाल शर्मा रा. रामनगर यांनी आक्षेपार्ह मजकूर टाकून फेसबूकवर कांमेन्टस केले. त्यामुळे यासंदर्भात राकेश अंगतसिंग ठाकुर (४०) रा. गौशाला वार्ड गोंदिया यांच्या तक्रारीवरुन गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम २९४, ५००, ३४ सहकलम ६७ माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेमुळे गोंदिया शहर पोलिसांनी सीआरपीसीअंतर्गत ४१ अ ची नोटीस सम्मी जायस्वाल व शिवकुमार शर्मा यांना पाठविली. चौकशीसाठी पोलिसांनी बोलाविल्यावर दिडशेच्यावर पोलीस ठाण्यात आलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी आम्हाला अटक करा, चौकशी का करता अशी मागणी केली. चौकशी करायची आहे तर ज्या व्यक्तिच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर आहे. त्या व्यक्तिला आपत्ती आहे किंवा नाही यासंदर्भात चौकशी करणाऱ्या आमदार अग्रवाल यांचे बयाण घ्या. त्यानंतर आम्ही बयान देवू असे म्हणाले. ज्याच्या नावाने बदनामी झाली तो व्यक्ती तक्रार करीत नसून दुसरा व्यक्ती तक्रार करतो आणि पोलीस गुन्हे दाखल करतात. हे न्यायसंगत आहे का? जो व्यक्ती तक्रार करतो तो सट्टा चालवितो आणि त्याचा हप्ता शहर पोलिसांना जातो त्यामुळे त्या व्यक्तिची तक्रार पोलीस सहज घेतात. असा आरोप भाजप पदाधिकाºयांनी या वेळी केला.
१७५ लोकांनी केली कॉमेन्ट्स
आमदार गोपालदास अग्रवाल व त्यांच्या कुटुंबियासंदर्भात आक्षेपार्ह मजकूर लिहिल्यानंतर त्यावर १७५ लोकांनी कॉमेन्ट्स केली. त्या सर्वांवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. परंतु फक्त शिव शर्मा व सम्मी जायस्वाल या दोघांवरच गुन्हा दाखल करने ही बाब न पटण्यासारखी असल्याचे भाजप पदाधिकाºयांचे म्हणने होते.
श्रेय लाटण्यावरुन घडले प्रकरण
गोंदियातील गौशाळेला १ कोटी रुपये मिळाले. ते कुणामुळे मिळाले यावर गोंदियात जोरदार चर्चा सुरु आहे. या १ कोटी रुपयांचे श्रेय आमदार गोपालदास अग्रवाल, विधान परिषदेचे सदस्य डॉ. परिणय फुके हे दोघेही घेतात. या श्रेयासाठी भाजप कार्यकर्ते आमदार गोपालदास अग्रवाल यांना कुठलेही श्रेय लाटणारा व्यक्तीमत्व असल्याचे सांगत असल्यामुळे यातूनच झालेल्या फेसबुकवरील चर्चेत आक्षेपार्ह मजकूर असल्याचे बोलल्या जाते.