सामाजिक समीकरण ठरणार महत्त्वाचा ‘फॅक्टर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 10:03 PM2018-05-19T22:03:10+5:302018-05-19T22:03:10+5:30
भंडारा-गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी २८ मे रोजी मतदान होत आहे. केवळ दहा दिवस मतदानाला असताना मतदार मात्र गप्प आहे. नेत्यांमध्ये मात्र उत्साह दिसून येत आहे. भरउन्हातही तुमसरात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते ‘डोअर टू डोअर’ प्रचार करताना दिसून येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी २८ मे रोजी मतदान होत आहे. केवळ दहा दिवस मतदानाला असताना मतदार मात्र गप्प आहे. नेत्यांमध्ये मात्र उत्साह दिसून येत आहे. भरउन्हातही तुमसरात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते ‘डोअर टू डोअर’ प्रचार करताना दिसून येत आहेत. निवडणुकीचा ज्वर जस जसा वाढत आहे तसे मंत्री, सेलिब्रिटींचे दौरे वाढत आहेत.
केंद्र व राज्याच्या नेतृत्वाविरूद्व बंड पुकारत नाना पटोले यांनी खासदारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करून सरकारविरूद्ध मोर्चा उघडला. त्यानंतर पोटनिवडणूक होऊ नये यासाठी न्यायालयात याचिकासुद्धा दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक घोषित केली. आता ही पोटनिवडणूक २८ मे रोजी होत असून या निवडणुकीकडे देश व राज्याचे लक्ष लागलेले आहे. या पोटनिवडणुकीत १८ उमेदवार रिंगणात असून भाजपकडून माजी आमदार हेमंत पटले तर राष्ट्रवादीकडून माजी आमदार मधुकर कुकडे हे दोन प्रमुख उमेदवार आहेत.
भरउन्हात रिंगणात असलेले सर्वच पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते जीवाचे रान करीत किल्ला लढवित आहेत. मात्र मतदार अद्याप गप्प आहेत. गाव आणि शहरात विशेषत: पानटपरी व चहाच्या टपरीवर निवडणुकीची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
मतदारांमव्ये निरूत्साह असल्यामुळे दोन्ही पक्षाचे नेते विचारात पडले आहेत. केवळ दहा महिन्याकरीता ही निवडणूक असल्यामुळे मतदारात कमालीचा निरूत्साह आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व भाजपसाठी ही निवडणूक अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची लढाई ठरली आहे.
राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे नाना पटोले, भाजपकडून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे गाव आणि शहर पिंजून काढत आहेत. कार्यकर्त्यांच्या भेटी आणि प्रचारसभांवर लक्ष केंद्रीत करून स्थानिकांशी संवाद साधण्यावर भर देण्यात येत आहे.
दिग्गज उमेदवारांच्या सभांनी गाजणार मैदान
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. काहीही झाले तरी ही जागा जिंकायची असा चंग या दोन्ही पक्षांनी बांधला आहे. भाजपचे उमेदवार हेमंत पटले यांच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहाडी आणि साकोलीत प्रचारसभा घेतली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे रविवारला तिरोडा, तुमसर आणि सोमवारला लाखांदूर येथे येत आहेत. भाजपची धुरा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे जबाबदारीने सांभाळत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसने आणि काँग्रेसने ताकदीनिशी प्रचाराला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, मनोहरभाई पटेल अॅकेडमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी यांच्यासह सेलेब्रिटी आणि देश व राज्य पातळीवरील नेते प्रचारसभा घेणार आहेत. याशिवाय पहिल्या दिवसांपासून माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल्ल पटेल आणि माजी खासदार नाना पटोले यांनी दोन्ही जिल्ह्यात प्रचारसभा घेत आहेत.
मतविभागणीची शक्यता
भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात कुणबी, तेली, पोवार, अनुसूचित जाती त्यानंतर अन्य समाजाचे मतदारांची क्रमवारी आहे. समाजाचे समिकरण साधण्यासाठी भाजपने पोवार समाजाचे हेमंत पटले यांना तर राष्ट्रवादीने कुणबी समाजाचे मधुकर कुकडे यांना उमेदवारी दिली आहे. आता कोणता समाज कुणाच्या पाठिशी राहतो. कोणत्या समाजातील मतांची विभागणी होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणारे असून अन्य समाजाची मते कशी विभाजीत होतात हे निकालाअंतीच कळेल.