शेतकऱ्यांवरील दुष्काळाचे सावट दूर होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 09:21 PM2018-02-04T21:21:28+5:302018-02-04T21:22:13+5:30
मागील ५० वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या गोंदिया तालुक्यातील कालव्यांच्या दुरूस्तीचे काम मागील दोन महिन्यांपासून सुरू झाले आहे. कालव्यांच्या दुरूस्तीमुळे या भागातील ११ हजार हेक्टरला सिंचनाची सोय होणार आहे.
ऑनलाईन लोकमत
गोंदिया : मागील ५० वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या गोंदिया तालुक्यातील कालव्यांच्या दुरूस्तीचे काम मागील दोन महिन्यांपासून सुरू झाले आहे. कालव्यांच्या दुरूस्तीमुळे या भागातील ११ हजार हेक्टरला सिंचनाची सोय होणार आहे. शेतकरी खरीप व रब्बी हंगामात पिके घेवू शकणार असून त्यांना दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागणार नाही.
सिंचन व शासनाच्या रेकार्डवर गोंदिया जिल्ह्यातील ७० टक्के क्षेत्र सिंचनाखाली असल्याची नोंद आहे. मात्र प्रत्यक्षात ३० ते ४० टक्के क्षेत्रालाच सिंचन होते. वैनगंगा, बाघ आणि इतर मोठ्या सिंचन प्रकल्पांमधून कालव्यांव्दारे शेतीला सिंचनाची सोय केली जाते. बाघ प्रकल्पातंर्गत ३५० किमी. कालव्यांच्या माध्यमातून शेतापर्यंत पाणी पोहचविले जाते होते. मात्र मागील ५० वर्षांपासून कालव्यांची दुरूस्ती करण्यात आली नव्हती. त्यामुळे हे कालवे केवळ नावापुरते ठरत होते. सिंचनाची सुविधा असतानाही त्यांच्या देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्याची वेळ येत होती.
आमदार गोपालदास अग्रवाल यांनी हा मुद्दा गांभिर्याने घेतला. त्यानंतर यासर्व गोष्टींचा सखोल अभ्यास करून बाघ प्रकल्पातंर्गत येणाºया ३५० किमी.च्या कालव्यांची दुरूस्ती करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कालव्यांच्या दुरूस्तीचे काम सुरू करण्यासाठी किती निधी आणि यंत्रणेची गरज आहे. ही सर्व माहिती घेवून त्यांनी मंत्रालयात पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले. मागील दोन महिन्यांपासून पोकलॅन्ड आणि डोजरव्दारे दिवसरात्र कालव्यांच्या खोलीकरण व दुरूस्तीचे काम सुरू आहे. आतापर्यंत जवळपास २० ते ३० किमी. कालव्यांच्या दुरूस्तीचे काम पूर्ण झाले आहे.
आ. अग्रवाल यांनी कालवा दुरूस्तीचे काम जून २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी पोकलॅन्ड आणि डोजर मशिनची संख्या वाढविण्यात येणार आहे. रविवारी आ.अग्रवाल यांनी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिकाºयांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या कालवा दुरूस्तीच्या कामांची पाहणी केली. यावेळी अग्रवाल यांनी दुरूस्तीपूर्वी आणि दुरूस्तीनंतर कालव्यांची स्थिती कशी याची वास्तविक स्थिती सुद्धा दौºया दरम्यान निदर्शनास आणून दिली.
तीन योजनांमुळे सिंचनाची समृद्धी
गोंदिया जिल्हा पाण्याने समृद्ध असला तरी त्या पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्याने आणि वितरण प्रणालीची योग्य व्यवस्था नसल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. हा अपव्यय टाळण्यासाठी व सिंचनाची समस्या दूर करण्यासाठी आ.अग्रवाल यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्याच प्रयत्नाने रजेगाव-काटी, तेवढा-शिवणी, नवेगाव-देवरी या तीन महत्त्वपूर्ण उपसा सिंचन योजना मंजूर करुन घेतल्या. यापैकी रजेगाव -काटी आणि तेढवा-शिवणी योजना पूर्ण झाली आहे. नवेगाव-देवरी योजनेच्या कामाला सुरूवात होणार आहे. या तीन योजनामुळे गोंदिया तालुक्यातील शेतकरी सिंचनात समृद्ध होणार आहे.
तीन तालुक्यांना लाभ
बाघ प्रकल्पातंर्गत ३५० किमी. कालवे आहे. या कालव्यांतर्गत गोंदिया तालुक्यातील ६८, आमगाव तालुक्यातील ४९ आणि सालेकसा तालुक्यातील ४६ अशा एकूण १६३ गावातील सिंचनाची सोय केली जाते. मात्र मागील ५० वर्षांपासून या कालव्यांच्या दुरूस्तीकडे संबंधित विभागांचे दुर्लक्ष झाले होते. मात्र आ. अग्रवाल यांच्या पुढाकाराने या ३५० किमी. कालवा दुरूस्तीचे काम सुरू झाल्याने या १६३ गावातील ३५ हजार ७१८ हेक्टर शेतीला सिंचनाची सोय होणार आहे.
देखभाल दुरूस्तीचा निधी जातो कुठे?
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडाळाच्या गोंदिया विभागाला दरवर्षी कालव्यांच्या देखभाल दुरूस्तीसाठी ३ ते ४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला जातो. मात्र यानंतरही कालव्यांची दुरवस्था झाली आहे. कालव्यांमध्ये गवत उगवले असून कित्येक कालव्यांचे लोखंडी गेट देखील गायब झाले आहेत. त्यामुळे देखभाल दुरूस्तीसाठी दिला जाणारा हा निधी जातो कुठे असा प्रश्न सुद्धा आ.अग्रवाल यांनी उपस्थित केला.
कालव्यांच्या दुरूस्तीमुळे हजारो हेक्टर शेती सिंचनखाली येण्यास मदत होणार आहे. एका पाण्याअभावी शेतकऱ्यांना पिके गमाविण्याची पाळी येणार नसून दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागणार नाही. यामुळे शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामात पिके घेण्यास मदत होणार असून शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उंचाविण्यास निश्चित मदत होईल.
- गोपालदास अग्रवाल
आमदार,गोंदिया विधानसभा क्षेत्र