गुटख्याचे व्यसन सोडविण्यात अपयश
By admin | Published: January 14, 2015 11:11 PM2015-01-14T23:11:54+5:302015-01-14T23:11:54+5:30
गुटखा सेवन करणाऱ्यांना तोंडाचे आजार होत असल्याने आता त्यावर बंदी आणण्याचा शासनाच्या निर्णय चांगला आहे. तरी या निर्णयाचे परिणामच शून्य असून आता गुटख्याचे व्यसन
इंदोरा बु. : गुटखा सेवन करणाऱ्यांना तोंडाचे आजार होत असल्याने आता त्यावर बंदी आणण्याचा शासनाच्या निर्णय चांगला आहे. तरी या निर्णयाचे परिणामच शून्य असून आता गुटख्याचे व्यसन जडलेल्यांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत.
गुटखा बंदीनंतर बहुतांश मोठ्या कंपन्यांनी महाराष्ट्रात थेट गुटखा विक्री कमी केली आहे. त्यामुळे चोरट्या मार्गाने गोंदिया जिल्ह्यात शेजारी राज्यातून गुटखा आयात केला जात आहे. अवैध मार्गाने आयात करणाऱ्यांसाठी हा मार्ग जोखमीचा आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरच तयार होणारा निकृष्ट गुटखा विकणे सुरू आहे.
दीड वर्षापूर्वी गुटखा विक्रीला बंदी करण्यात आली. विक्रीवर बंदी लादली असली तरी उत्पादनावर कोणतेही बंधने नसल्याने जिल्ह्यातील प्रत्येक गावाच्या कानाकोपऱ्यात गुटखापुडी सहज उपलब्ध होते. बंदीपूर्वी एक पुडी घेवून गुटखा खाणाऱ्या युवकाच्या माथी आता एकाच वेळी पाच पुड्या मारल्या जातात.
साहजीकच खिशात गुटखा पुड्या असल्याने वाटेल तेव्हा तो फाडून तोंडात टाकण्याची सवय वाढली आहे. बंदीपूर्वी गुटखा खाणाऱ्यांची संख्या अधिक असली तरी बंद नंतर ती कमी होईल, हा शासनाचा उद्देश्य एकूणच पूर्ण झालेला नसल्याचे जिल्ह्यात दिसून येत आहे.
गुटखा खाण्याची अमल आली तेव्हाच पुडी विकत घेण्याची सवय असणारे ५० टक्केपेक्षा अधिक तरूण आणि प्रौढ होते. आता मात्र हेच तरूण दिवसभर पुरेल एवढ्या गुटखा पुड्या एकाच वेळी विकत घेतात.
खिशात पुड्या राहत असल्याने कुठेही असो, पुडी विकत घेण्यासाठी जावे लागत नाही. अशा पुड्या घेणाऱ्यांची संख्या ५५ टक्के आहे. गुटखा खाण्याची आठवण झाल्यानंतर पानठेल्यावर जाऊन गुटखा विकत घेणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
म्हणजेच बंदीनंतरही गुटखा खाणे बंद करणे किंवा तंबाखूजन्य पदार्थापासून परावृत्त झालेल्यांची संख्या नगण्य आहे, असे दिसून येत आहे. (वार्ताहर)