बॅण्ड व ट्रेड मार्क वापरून तयार करायचा नकली बिडी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 03:30 PM2024-08-13T15:30:44+5:302024-08-13T15:31:45+5:30

एकावर गुन्हा दाखल : २८ हजार ५०० रुपयांचा माल जप्त

Fake bidi made using band and trade mark | बॅण्ड व ट्रेड मार्क वापरून तयार करायचा नकली बिडी

Fake bidi made using band and trade mark

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :
भारत प्रायव्हेट लिमिटेड मेंगलोर, राज्य कर्नाटक ३० बॅण्ड, ३० नंबर बिडी या अधिकृत कंपनीचे बॅण्ड व ट्रेड मार्कचा वापर करून येथे नकली बिडी तयार करणाऱ्याविरुद्ध धाड घालून रविवारी (दि. ११) कारवाई करण्यात आली. यामध्ये बनावट बिड्यांचे पुडे, कागदी लेबल, लाकडी साचे व इतर साहित्य असा २८ हजार ५०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. यासंदर्भात रामनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


यासंदर्भात उत्तरप्रदेश राज्यातील झाशी दिबकई येथील हरगोविंदसिंग लक्ष्मणसिंग राठोड (४६) या चेकिंग ऑफिसरने दिलेल्या तक्रारीनुसार, भारत प्रायव्हेट लिमिटेड मेंगलोर, राज्य कर्नाटक ३० ग्रॅण्ड ३० नंबर बिडी (अधिकृत कंपनी) बॅण्ड व ट्रेड मार्कचा वापर करून दुसऱ्या कुणालाही या कंपनीच्या बॅण्डच्या बिड्या, कट्टे व पुडे तयार करण्याचा अधिकार नाही. या कंपनीचे बॅण्ड व ट्रेड मार्क वापरून बनावटकरण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार कंपनीतर्फे राठोड यांना देण्यात आले आहेत.


अशात शहरातील पुनाटोली परिसरात अधिकृत असलेल्या कंपनीच्या नावाचा, बॅण्ड व ट्रेड मार्कचा वापर करून बनावट बिड्या, बिड्यांचे कट्टे, पुडे तयार करून विक्री करीत असल्याची माहिती प्राप्त झाली.


यावर राठोड यांनी पोलिस अधीक्षकांना याबाबत कायदेशीर कारवाई करण्याकरिता रीतसर परवानगी मागितली होती. यावर पोलिस अधीक्षकांनी रामनगर ठाणेदारांना आदेशित करून राठोड यांना मदत करून कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे रामनगर पोलिसांचे पथक कारवाईसाठी नेमण्यात आले होते.


याला केली अटक
या प्रकरणात माणिकलाल बोदलू पानतवणे (५८, रा. पुनाटोली) हा अवैधरीत्या विनापरवाना कायदेशीर अधिकार नसतानादेखील आपल्या घरी स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता नकली बिड्या तयार करून विक्री करीत असून धाड घातली असता त्याच्या घरात बिड्या मिळून आल्या. आरोपीच्या घरून बनावटी बिड्या, बिड्यांचे कट्टे, कागदी लेबल, लाकडी साचे व इतर साहित्य असा २८ हजार ५०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध कलम ५१, ६३, कॉपीराईट अधिनियम १९५७, सहकलम १०३, १०४ ट्रेडमार्क अधिनियम १९९९ अन्वये रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या आदेशाप्रमाणे उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बानकर, पोलिस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस पथक सहायक पोलिस निरीक्षक राजू बस्तवाडे, पोलिस हवालदार ओमेश्वर मेश्राम, राजू वनवे, पोलिस शिपाई दुबे यांनी केली आहे.
 

Web Title: Fake bidi made using band and trade mark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.