शेतकरी दिसायला मोठा, पण आतून पोकळ
By admin | Published: November 28, 2015 02:56 AM2015-11-28T02:56:53+5:302015-11-28T02:56:53+5:30
यावर्षी नैसर्गिक आपदेमुळे शेतकऱ्यांना निम्म्यापेक्षा कमी उत्पन्न हाती येणार असून शेतकऱ्यांची स्थिती अतिशय गंभीर होत चालली आहे.
बन्सोड यांचे मत : मजुरांना पेंशन मिळवून देण्याचा प्रयत्न
काचेवानी : यावर्षी नैसर्गिक आपदेमुळे शेतकऱ्यांना निम्म्यापेक्षा कमी उत्पन्न हाती येणार असून शेतकऱ्यांची स्थिती अतिशय गंभीर होत चालली आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीला पाहता तो दिसतो मोठा, पण आतून पोकळ आहे, असे मत माजी आ. दिलीप बंसोड यांनी व्यक्त केले.
बरबसपुरा येथे मंडईनिमित्त तमाशाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
उद्घाटन माजी आ. दिलीप बन्सोड यांच्या हस्ते सरपंच ममता लिचडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. अतिथी म्हणून पं.स. सदस्य संध्या गजभिये, उपसरपंच धनलाल रहांगडाले, माजी सरपंच सदाशिव कटरे, पोलीस दिलीप मेश्राम, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष भिष्मकुमार परिहार, ग्रा.पं. सदस्य ममता पटले, तिडके, तेजराम चौधरी उपस्थित होते.
या वेळी सरपंच ममता लिचडे आणि उपसरपंच धनलाल रहांगडाले यांनी गावच्या समस्या निदर्शनात आणून दिल्या. उद्घाटनीय भाषणात माजी आ. बंसोड यांनी, पदावर असताना बरबसपुरा गावच्या समस्या आणि विकास कामाकरिता भरपूर प्रयत्न केले. आज आपण पदावर नसलो तरी समस्या घेऊन या, आपण निश्चितच सोडविण्याचा प्रयत्न करू. शेतकरी शब्द समोर येताच खूप वाईट वाटते. आज शेतकऱ्यांची समस्या अतिशय गंभीर आहे. यावर्षी शेतकऱ्यांच्या नशिबी ५० टक्के उत्पन्न मिळणार नसून त्यांच्यासमोर आर्थिक समस्या निर्माण होणार आहे, असे ते म्हणाले.
मग्रारोहयोतंर्गत १०० दिवसांचे काम प्रत्येक मजुरास मिळावे याकरिता ग्रा.पं.ने कामाची योजना तयार करावी. मजुरांची यादी तयार करुन ती मंजूर करावी. याकरिता आपण केव्हाही मदत करण्यास तयार आहोत. ज्या शेतकऱ्यांनी शंभर दिवस कामे केले त्यांची नावे कल्याण कामगार आयुक्तालयात नोंदणी करून त्यांना पेंशन मिळवून देण्याची जबाबदारी आपण स्वीकारू व त्यासाठी प्रयत्नास सुरूवात केल्याचेही त्यांनी सांगितले.
संचालन प्रा. नरेश असाटी यांनी केले. आभार किशोर असाटी यांनी मानले. (वार्ताहर)
ओबीसीसाठी निधी उपलब्ध होत नाही
घरकुलाचा निधी असो किंवा शिष्यवृत्तीचा निधी असो, ८० टक्के निधी केंद्रशासन आणि २० टक्के निधी राज्यशासन देते. परंतु घरकुलाकरिता निधी उपलब्ध होत नसल्याने लाखो घरकूल आजही तयार होवू शकले नाहीत. ओबीसीकरिता विकासाच्या नावावर होत असलेला अन्याय विरोधात येत्या हिवाळी अधिवेशनात आपण निदर्शनात आणून देवू, असे माजी आ. बंसोड यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
शाळा समित्यांनी लक्ष केंद्रित करावे
सध्या शिक्षण पध्दतीत बदल होत असल्याने भविष्यात शिक्षक संख्येची समस्या निर्माण होणार आहे. पहिली ते सातवीपर्यंत असणाऱ्या शाळेत १०० पटसंख्या असेल तर मात्र तीन शिक्षक कार्यरत राहतील. तीन शिक्षक सात वर्गांना शिक्षण देवू शकणार नाही. अशावेळी खेडे गावातील विद्यार्थी गावातच राहणार नाही. याकरिता शाळा समिती आणि पालकांनी शाळेकडे लक्ष देऊन अशा समस्या निदर्शनात आणून द्यावे. यावर शासन स्तरावर आपल्याला मार्ग काढण्याचा प्रयत्न करता येईल, असा सल्ला माजी आ. बंसोड यांनी दिला.