Gondia | कर्जबाजारी आणि नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
By अंकुश गुंडावार | Published: September 3, 2022 04:05 PM2022-09-03T16:05:52+5:302022-09-03T16:15:22+5:30
बँक आणि सावकाराचे मिळून त्याच्यावर जवळपास एक लाखाचे कर्ज होते.
सालेकसा (गोंदिया) : सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून एका ४५ वर्षीय शेतकऱ्यांने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि.२) रात्री १२.३० वाजताच्या सुमारास तालुक्यातील नवेगाव येथे घडली. प्रल्हाद लखन दमाहे (४५) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
प्रल्हाद दमाहे यांनी तीन वर्षांपूर्वी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून कर्ज घेतले होते. बँक आणि सावकाराचे मिळून त्याच्यावर जवळपास एक लाखाचे कर्ज होते. कर्ज फेडण्यावरून प्रल्हाद दमाहे हे मागील काही दिवसांपासून चिंताग्रस्त होते. बँक आणि सावकाराचे कर्ज फेडण्याच्या चिंतेतून आलेल्या नैराश्यामुळे प्रल्हाद दमाहे यांनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास स्वत:च्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी सालेकसा पोलिसांनी प्रकरण दाखल केले आहे.