शेतकरी धडकले तहसील कार्यालयावर
By Admin | Published: July 31, 2016 12:33 AM2016-07-31T00:33:02+5:302016-07-31T00:33:02+5:30
जय जवान, जय किसान असे घोषवाक्य असले तरी शेतकरी याला अपवाद ठरला आहे.सुकळी, चारगाव,
कारखान्यांना दिली वीज : ढोरवाडा, सुकळी, माडगी, चारगाव कृषीपंपाचा वीज पुरवठा बंद
तुमसर : जय जवान, जय किसान असे घोषवाक्य असले तरी शेतकरी याला अपवाद ठरला आहे.सुकळी, चारगाव, ढोरवाडा व माडगी शेतशिवारात मागील नऊ दिवसापासून कृषी पंपाचा वीज पुरवठा बंद आहे. धानाचे पीक माना खाली टाकत आहे. शेतात भेगा पडणे सुरू झाले आहे. दुसरीकडे या परिसरातील कारखान्यांना मात्र नियमित वीज पुरवठा करणे सुरू आहे. याविरोधात आज शेकडो शेतकऱ्यांनी तुमसर तहसील गाठून तहसीलदारांना निवेदन देवून रोष व्यक्त केला.
२१ जुलै रोजी माडगी देव्हाडी येथे ११ के.व्ही. उप केंद्रात मोठा स्फोट झाला. शहरासह सुमारे ६० गावे अंधारात बुडाली होती. वीज अभियंत्यांनी घरगुती वीजपुरवठा चार तासांनी दुसरीकडून सुरू केला. २८ जुलै रोजी या परिसरातील क्लेरियन ड्रग कंपनी, युनिडेरींडेंट कारखाना, एलोरा पेपर मील व वैनगंगा शुगर अॅन्ड पॉवर कंपनीला दुसरीकडून वीज पुरवठा करण्यात आला. मोहाडी तालुक्यातील रोहा, बेटाळा परिसरातील गावांना भंडारा येथून वीज पुरवठा करण्यात येत आहे.
देव्हाडी परिसरातील ढोरवाडा, सुकळी, चारगाव व माडगी या गावातील कृषी पंपाचा वीजपुरवठा अद्याप बंद आहे. शेतातील धान पीक पिवळे पडले आहे. शेतात पाण्याअभावी भेगा पडल्या आहेत. विहिरीत पाणी आहे, परंतु वीज नाही. मागील दहा दिवसांपासून पावसाने डोळे वटारले आहे. जो पैसा रोवणी, शेतीच्या मशागतीवर खर्च केला तो येथे व्यर्थ जाण्याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावीत आहे. यापेक्षा धान पेरणी व रोवणी केली नसती तर बरे झाले असते, अशी प्रतिक्रिया आता शेतकरी देत आहे.
वीज वितरण कंपनीचे अधिकारी रोहित्र दुरूस्ती करीत आहेत. परंतु त्यांना अद्याप यश आले नाही. केवळ येथे वेळ मारून नेली जात आहे. शुक्रवारी ढोरवाडा व सुकळी येथील शेकडो शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय गाठून प्रभावी तहसीलदार निलेश गोंड यांना व्यथा सांगितली व निवेदन दिले.
शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी तथा आमदार चरण वाघमारे यांच्या कार्यालयात निवेदन दिले. वीज वितरण कंपनीच्या विरोधात ग्राहक मंचात तक्रार करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
येथे आंदोलन करण्यापेक्षा सामूहिक आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरला नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.
शेतकऱ्यांमध्ये श्रीधर बोंदरे, भाऊलाल बांडेबुचे, माणिक बोंदरे, विठ्ठल बोंदरे, लक्ष्मण बोंदरे, सुरेश चौधरी, लंकेश जगनाडे, दिलीप सपाटे, मधुकर गोमासे, शिवदास बुद्धे, सचिन ठवकर, ग्यानीराम बोंदरे, लक्ष्मण ठवकर, अंकुश बुद्धे, दिलीप बोंदरे, नामदेव बोंदरे, देवदास बोंदरे, शंकर कुकडे, श्यामलाल भोयर, भागवत बोंदरे, कृष्णा कुकडे, प्यारेलाल बांडेबुचे यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)