२०१५ व १६ मध्ये गोंदियात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By कपिल केकत | Published: December 21, 2023 05:48 PM2023-12-21T17:48:00+5:302023-12-21T17:48:30+5:30

प्रत्येकी ३१ शेतकऱ्यांनी मरण पत्करले.

farmer ends life in Gondia in 2015 and 16 says report | २०१५ व १६ मध्ये गोंदियात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या

२०१५ व १६ मध्ये गोंदियात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या

कपिल केकत,गोंदिया : जगाचा अन्नदाता म्हणून ओळख असलेला शेतकरी आजही कर्जबाजारी व उपाशीपोटी राहात आहे. हेच कारण आहे की, अशा जगण्यापेक्षा तो मरण पत्करत आहे. जिल्ह्यातही सन २००२पासून शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. मात्र, सन २०१५ व २०१६ मध्ये सर्वाधिक ६२ शेतकऱ्यांनी मरण पत्करले. ही दोन वर्ष रक्तरंजित करणारी ठरली असून, यामुळेच या दोन वर्षांची आठवण न केलेलीच बरी अशी स्थिती आहे.

जग झपाट्याने प्रगती करत आहे. त्याव्दारे प्रत्येकजण आपली प्रगती साधत आहे. मात्र, शेतकरी होता तसाच आहे. काही शेतकरी परिस्थितीवर मात करून पुढे निघून गेले यातही शंका नाही. मात्र, बहुतांश शेतकऱ्यांच्या नशिबी आजही दोनवेळची भाकरी नाही. कधी निसर्ग व तर कधी परिस्थिती अवघ्या जगाचे पोट भरणाऱ्या अन्नदात्याशी खेळ खेळतच आहे. हेच कारण आहे की, अन्नदाता स्वत:च उपाशी असून, कित्येकांवर कर्जाचे डोंगर उभे आहे. अशात या कर्जाची परतफेड शिवाय कुटुंबाचे भरण पोषण करण्यातही अपयशी ठरत असल्याने शेतकरी या स्थितीपेक्षा मरण पत्करत आहेत. हेच कारण आहे की, शेतकरी आत्महत्येने अवघे राज्य ग्रासले असून, यापासून गोंदिया जिल्हाही सुटलेला नाही. जिल्ह्यात सन २००२पासून शेतकरी आत्महत्यांची मोजदाद सुरू झाली.

सन २००२ मध्ये जेमतेम एक शेतकरी आत्महत्येची नोंद असून, त्यानंतर हे मरणसत्र आतापर्यंत अखंडितपणे सुरूच आहे. मात्र, सन २०१५ व २०१६ ही दोन वर्ष जिल्ह्यासाठी सर्वाधिक दु:खाची ठरली आहेत. सन २०१५ मध्ये ३१ तर सन २०१६ मध्येही ३१ अशा एकूण ६२ आत्महत्यांची नोंद घेण्यात आली आहे. २३ वर्षांच्या या लेखाजोखात या दोन वर्षांतच सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत.

४२ कुटुंबीय मदतीपासून वंचित:

सन २०१५ मध्ये ३१ तर २०१६ मध्येही ३१ अशा सर्वाधिक आत्महत्यांची नोंद घेण्यात आली आहे. या एकूण ६२ आत्महत्यांमध्ये फक्त २० आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत देण्यात आली आहे. तर तब्बल ४२ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आल्याने या कुटुंबीयांना शासनाकडून मदत मिळालेली नाही. यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या निकषांची आडकाठी आली आहे.

२००६ व १० मध्येही ४४ शेतकरी आत्महत्या :

सन २०१५ व २०१६ मध्ये सर्वाधिक ६२ शेतकरी आत्महत्यांची नोंद असतानाच त्यानंतर सन २००६ व २०१० मध्येही प्रत्येकी २२ अशा एकूण ४४ आत्महत्यांची नोंद घेण्यात आली आहे. यातील २००६ मधील १७ तर २०१० मधील १६ प्रकरणे पात्र ठरली असून, शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळाली आहे. मात्र, ११ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली असून, या कुटुंबीयांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागले आहे.

दोन अंकातील शेतकरी आत्महत्येचे वर्ष -

वर्ष - आकडेवारी

२००६ - २२

२००७ - १९
२००८ - १८

२००९ - १२
२०१० - २२

२०११ - १३
२०१२ - १०

२०१४ - १७
२०१५ - ३१

२०१६ - ३१
२०१७ - १७

२०१८ - १७
२०१९ - १०

२०२१ - १६

Web Title: farmer ends life in Gondia in 2015 and 16 says report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.